Join us  

भाजपमध्ये हालचालींना वेग; आज, उद्या बैठक; पुण्यात २१ जुलै रोजी कार्यसमितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 6:33 AM

भाजपचे सोशल मीडिया सेल आणि आयटी सेल यांच्यात मोठे बदल लवकरच करण्यात येणार आहेत.

मुंबई : भारतीय जनता पक्षात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक १८ आणि १९ जुलै रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात होणार आहे. पुणे येथे भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक २१ जुलै रोजी होईल. ९ ऑगस्टपासून राज्यात पक्षातर्फे संवाद यात्रा काढण्यात येणार आहेत.

कोअर कमिटीच्या बैठकीला पक्षाचे केंद्रीय प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे राज्यातील प्रमुख ३० नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चिंतन करणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने नेमकी रणनीती काय असली पाहिजे याबाबत कोअर कमिटीतील प्रत्येकाचे मत भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव जाणून घेतील, त्या आधारे पक्षनेतृत्वाशी चर्चा करून अंतिम रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.    पुण्यात २१ जुलै रोजी होणाऱ्या कार्यसमितीच्या बैठकीचा अजेंडाही कोअर कमिटी निश्चित करेल. एरवी कोअर कमिटीच्या बैठकीला सात ते आठ नेते उपस्थित राहतात; पण यावेळी अपवाद म्हणून प्रमुख ३० नेत्यांना बैठकीसाठी बोलविले आहे.

क्रांतिदिनी यात्रारंभ

पक्षातर्फे लवकरच संवाद यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली होती. ९ ऑगस्ट म्हणजे क्रांतिदिनी या यात्रांचा एकाच दिवशी प्रारंभ केला जाईल. समारोप १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिनी होईल. शहरांमध्ये प्रभागनिहाय तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद गणनिहाय वेगवेगळ्या यात्रा काढण्यात येणार आहेत. पक्षाचे सर्व लहानमोठे नेते, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी यांना या यात्रांमध्ये नेतृत्व दिले जाणार आहे.

मीडिया सेल, आयटी सेलमध्ये लवकरच बदलाची शक्यता

भाजपचे सोशल मीडिया सेल आणि आयटी सेल यांच्यात मोठे बदल लवकरच करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचाराला परिणामकारक प्रत्युत्तर या दोन्ही सेलकडून दिले गेले नाही, अशी पक्षात चर्चा आहे. त्यातच सेलच्या प्रमुखांवरून मध्यंतरी वादंग उठले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही सेलमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या एक-दोन दिवसात त्याबाबत निर्णय होईल.

टॅग्स :भाजपामहाराष्ट्र