मुंबई : मुंबई महानगर पालिका मुंबईतल्या पायभूत सेवा सुविधांचा विकास केला जात असल्याचा दावा करत असली तरी या पायाभूत सेवा सुविधा पुरविताना संबंधित प्रकल्पांच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीबाबत पुरेशी माहिती नागरिकांना देत नाही. परिणामी आपणास मिळत असलेल्या सेवा सुविधांसाठी नेमके किती रुपये खर्च झाले आहेत? याचा सुगावा अखेरपर्यंत नागरिकांना लागत नाही. मात्र नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, आता मुंबईतल्या ८ पुलांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चात अतिरिक्त ८ कोटी ४६ लाख रुपयांची भर पडली आहे.फोर्ट येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने सर्व पूलांचा आढावा घेतला. आता स्ट्रक्चर ऑडीटनुसार पूलांची कामे हाती घेण्यात येत असून, दुरुस्तीसाठीच्या आठ पुलांमध्ये महालक्ष्मी रेल्वे पूल, सायन रेल्वे स्थानक पूल, टिळक पूलाकडील फ्लाय ओव्हर, दादर फुलबाजाराकडील पूलाचा समावेश आहे. या व्यतीरिक्त माहिम फाटक पूल, करीरोड रेल्वे स्थानक पूल, सायन रुग्णालय येथील पूल आणि दादर धारावी नाल्यावरील पादचारी पूलाचाही समावेश आहे. या पूलांच्या दुरुस्तीसाठी अधिकच्या ८ कोटी ४६ लाख रुपयांस मंजुरी मिळाली आहे. हिमालय पूलाची दुर्घटना झाली तेव्हा या आठ पूलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ३३ लाख खर्च होणार होता. मात्र ऑडीटनुसार हा खर्च २३ कोटी ६० लाख झाला. म्हणजे यात ८ कोटी ८४ लाखांहून अधिक वाढ झाली आहे.कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होते आहे. लॉकडाऊन शिथिल होत असतानाच कामांनी देखील वेग पकडला आहे. अशाच काहीशा पूलांच्या दुरुस्तीच्या कामांसह मुंबईतल्या विविध पायाभूत सेवा सुविधांच्या प्रकल्प कामांनी देखील वेग पकडला आहे. मात्र सदर पूलांची कामे वेग पकडत असली तरी वाहतूकीच्या नियोजनासह उर्वरित नियोजन करताना पालिकेची तारेवरची कसरत होणार आहे. कारण आता मुंबईदेखील वेग पकडत असून, कामासाठी घराबाहेर पडत असलेल्या नागरिकांना याचा त्रास होणार नाही. वाहतूकी कोंडी होणार नाही. कामादरम्यान अपघात होणार नाही; अशा अनेक गोष्टींची काळजी पालिकेला घ्यावी लागणार आहे.