मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:53 AM2018-01-02T04:53:43+5:302018-01-02T04:54:01+5:30
गेल्या परीक्षेला सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत उडालेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते, पण आता झालेल्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाल्याने, विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे.
मुंबई : गेल्या परीक्षेला सुरू केलेल्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत उडालेल्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आले होते, पण आता झालेल्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाल्याने, विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात सुटकेचा श्वास सोडला आहे. विद्यापीठाच्या काही परीक्षा सुरू आहेत, तरीही विद्यापीठाने छोट्या अभ्यासक्रमांचे तब्बल ६७ निकाल जाहीर केले आहेत, तर अन्य अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती विद्यापीठाकडून मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वेळी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना गोंधळ झाला होता. तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाला होता, पण विद्यापीठाने यात सुधारणा केल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे, आता तपासणीत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
आत्तापर्यंत तब्बल ५ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, तपासणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या परीक्षांचे निकाल हे ४५ दिवसांच्या आत लागतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे आता झालेल्या परीक्षांचे निकाल वेळेत लागतील, असे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या वेळी वाणिज्य शाखेचे निकाल लागण्यास उशीर झाला होता. वाणिज्य शाखेला अधिक विद्यार्थी असल्याने हा गोंधळ झाल्याचे समोर आले होते, पण आताच्या परीक्षेच्या ६ लाख १७ हजार उत्तरपत्रिका आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख ३१ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे.
विधि अभ्यासक्रमाच्या २८ हजार २८६ उत्तरपत्रिका आहेत, त्यापैकी ९ हजार १८३ उत्तरपत्रिका तपासणी झाली आहे. १२ लाख ५८ हजार
६७५ उत्तरपत्रिकांपैकी ४ लाख
९४ हजार ८२१ उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे.
नवीन कुलगुरू निवडीसाठी बैठक
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळामुळे डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरू पदावरून काढून टाकण्यात आले. आता नवीन कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची पहिली बैठक बुधवार, ४ जानेवारीला होईल. या वेळी शोध समितीचे सदस्य आणि राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित असणार आहेत. या हालचालीनुसार कुलगुरू निवड प्रक्रियेला आता वेग आले असून, लवकरच या संदर्भात जाहिरातदेखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.