तापमानवाढीचा वेग धोकादायकच

By admin | Published: May 27, 2017 11:27 PM2017-05-27T23:27:12+5:302017-05-27T23:27:44+5:30

तापमानवाढीचा वेग हा धोकादायकच आहे, असे मत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’मध्ये मांडले.

The speed of the temperature rise is risky | तापमानवाढीचा वेग धोकादायकच

तापमानवाढीचा वेग धोकादायकच

Next

‘क्लायमेट चेंज’ ऋतुबदलास कारणीभूत नाही किंवा ते शक्यही नाही. आणि जरी असे झाले तरी त्याला पन्नास वर्षे लागतील. ‘क्लायमेट चेंज’बाबत बोलायचे झाल्यास ‘ग्रीन हाऊस गॅस’ म्हणजेच कार्बन उत्सर्जन यास कारणीभूत आहे. २०१६ साली कार्बन डायआॅक्साइडने ४०० पीपीएम पातळी ओलांडली आहे. मुळात हे प्रमाण २५० पीपीएम असणे गरजेचे आहे. कार्बन उत्सर्जनात वाढ झाली की साहजिकच तापमानात वाढ होते. यावर उपाय करण्यासाठी जागतिक हवामान संघटना कार्यरत आहेत आणि ‘पॅरिस करार’ही करण्यात आला आहे. यासाठी जगभरात २१६ देश सभासद म्हणून कार्यरत आहेत. त्यानुसार तापमानवाढ रोखण्यासाठी विकसित आणि विकसनशील देश कार्यरत असून, यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. मात्र असे असले तरी तापमानवाढीचा वेग हा धोकादायकच आहे, असे मत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’मध्ये मांडले.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनचे पूर्वानुमान वर्तविले आहे. सद्य:स्थितीमध्ये मान्सून बंगालच्या उपसागरात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनची गती वाढविण्यास अनुकूल आहे. मान्सूनची गती वाढल्यानंतर बंगाल खाडी आणि ईशान्य दिशेसह केरळकडे मान्सून आगेकूच करेल. मान्सूनचा हा प्रवास याच गतीने होत राहिला तर ३० मेदरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होईल. केरळ येथे मान्सून दाखल झाल्यानंतर येथील हवामान केंद्रावर त्याची ६० टक्के नोंद होणे अपेक्षित आहे. त्यानंतर कुठे मान्सून केरळात दाखल झाला, असे हवामान खात्याकडून जाहीर केले जाईल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने यंदाच्या पावसाळ्यात देशभरात ९६ टक्के पाऊस पडेल, असे अनुमान वर्तविले आहे. हवामान खात्याचे पूर्वानुमान हे दीर्घकालीन आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे हे अनुमान असून, या पावसाची सरासरी नोंद ८९ सेंटीमीटर एवढी गृहीत धरण्यात आली आहे. ३० मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असतानाच हवामान खात्याकडून मान्सूनचे दुसरे पूर्वानुमानही वर्तविण्यात येईल. २ जून रोजी मान्सूनचे दुसरे पूर्वानुमान वर्तविले जाईल. दुसरे असे की, मान्सूनचा विचार करताना पूर्व आणि पश्चिम किनारी क्षेत्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे हे फायद्याचे असते. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले की मान्सून क्षेत्राला एनर्जी मिळते. विशेषत: कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यालगत आले की, मान्सून अधिकाधिक पसरेल, अशी आशा असते.
भारताचे एकूण चार भाग असून, या चारही भागांमधील मान्सूनचा आढावा हवामान खात्याकडून घेतला जातो. मान्सून अथवा पावसाचे मॉड्युल असतात. ‘मान्सून मिशन’द्वारे मान्सूनचे अंदाज वर्तविले जातात. पावसाचे अंदाज अथवा मान्सूनचा अंदाज वर्तविताना प्रशांत महासागराचे तापमान, अलनिनोसह उर्वरित घटकांचा प्रामुख्याने अभ्यास केला जातो. मुळात आपल्याकडे मान्सूनची गणिते दूरवर पसरली आहेत. मान्सूनचा अंदाज वर्तविताना समुद्राच्या तापमानाची प्रामुख्याने नोंद घेतली जाते. शिवाय अलनिनोचा मान्सूनवर प्रभाव आहे की नाही, याचाही अभ्यास केला जातो.
कृषी क्षेत्राचा विचार करताना हवामान खात्याच्या अंदाजामध्ये अचूकता कशी येईल, याकडे आमचे प्रमुख लक्ष असते. प्रथमत: आम्ही कृषी क्षेत्रासाठी राज्यस्तरीय अंदाज वर्तवीत होतो. मात्र त्यानंतर आम्ही जिल्हास्तरीय अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे आता तर आम्ही पाच दिवसांचे अंदाज वर्तवत आहोत. आणि याचा फायदा कृषी क्षेत्राला म्हणजे शेतकरीवर्गाला होत आहे. कृषी क्षेत्रासाठी वर्तविण्यात आलेल्या अंदाजाचा फायदा कृषी विद्यापीठांनाही होतो. कृषी विद्यापीठे आमचा अंदाज पाहून कृषीविषयक सल्ले देतात. साहजिकच त्याचा फायदा पुन्हा शेतकरीवर्गाला होतो. भारतीय हवामान शास्त्र विभागाची कृषीविषयक हवामान अंदाजाची यंत्रणा अत्याधुनिक असल्याने इतर देशांकडूनही त्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र हे एवढे सोपे नाही. कारण यासाठी आम्ही गेल्या आठ वर्षांपासून या विषयावर काम करत आहोत.
चक्रीवादळाचा इशारा देण्यासाठी हवामान खाते नेहमीच सज्ज असते. मागील पाच वर्षांत चक्रीवादळाबाबतची माहिती देण्यात आम्ही अचूकता साधली आहे. आणि भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक होत आहे.
‘हुदहुद’ चक्रीवादळ आले तेव्हा हवामान खात्याने चांगली कामगिरी केली होती. १९९९ साली ओरिसा येथे ‘सुपर सायक्लोन’ आले तेव्हा दहा हजार नागरिकांचा जीव गेला होता. २०१४ साली जेव्हा ‘हुदहुद’ चक्रीवादळ आले तेव्हा मनुष्यहानीचे प्रमाण कमी होते. यात नमूद करण्यासारखे हे की, आम्ही आमची यंत्रणा अधिक अत्याधुनिक करत दिलेला इशारा कामी आला. परिणामी झाले असे की मनुष्यहानीचे प्रमाण कमी झाले.
मार्च २०१७ मध्येच उष्णतेच्या लाटेचे पूर्वानुमान दिले होते. मध्य भारतात उष्णतेची लाट येईल, असा इशारा आपण दिला होता. तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील, असा अंदाज आपण वर्तवला होता. त्यानुसार मध्य प्रदेश, रायपूर, तेलंगणा, चंद्रपूर आणि वर्धा येथे उष्णतेची लाट आली आणि भिराचे तापमान ४७ अंशांवर पोहोचले यात विशेष काही नाही. कारण मागील कित्येक वर्षांपासून भिराचे सरासरी तापमान ४४ अंश नोंदविण्यात येत आहे. जर मुंबई ४० अंशांवर गेली असती तर त्याची नोंद घेण्यासारखे आहे. आणि दोन वर्षांपूर्वी मुंबईचे कमाल तापमान ४२ अंश नोंदवण्यात आले होते. दुसरे असे की, भिराचा विचार करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करावा लागेल. येथील काळे पाषाण आणि उर्वरित घटकांमुळे तापमान जास्त नोंदवले गेले.

शेतकऱ्यांना हवामानाचे अपडेट
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खरीप पिकांबाबत
आढावा बैठक झाली. राज्यातील पाऊस कसा असेल? याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सरासरी पावसाच्या चर्चेसह शेतकऱ्यांना हवामानाचे अपडेट
कसे देता येईल, यासंबंधीच्या
चर्चेवर भर देण्यात आला.

अद्ययावत मान्सून मॉड्युल
डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या मॉड्युलचा आपण कित्येक
वर्षे वापर केला. साहजिकच त्यांचे मॉड्युल उत्तमच होते. मात्र काही कालावधीनंतर म्हणजे सद्य:स्थितीमध्ये हवामानात झालेल्या बदलानुसार मॉड्युलमध्येही बदल करण्यात आले. आता आपण मान्सूनच्या अभ्यासासाठी पाच घटकांचा अभ्यास करतो. शिवाय या मॉड्युलमध्ये अधिकाधिक सुधारणा कशी करता येईल, याचाही सातत्याने अभ्यास सुरू आहे.

डॉप्लरसह रडार सज्ज
भारतीय हवामान शास्त्र विभाग सद्य:स्थितीमध्ये अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करते आहे. डॉप्लर, रडारसारख्या यंत्रणांच्या मदतीने हवामानाचा अंदाज वेगाने आणि अचूक देता येत आहे. शिवाय यापूर्वी लागणारा वेळही कमी झाला आहे.

उपग्रहाच्या नोंदी लाभदायक : अवकाशात सोडले
जाणारे उपग्रह कायमच हवामान खात्याला
मदतनीस म्हणून काम करतात. चक्रीवादळाच्या छायाचित्रांपासून हवामानाची प्रत्येक नोंद उपग्रहाद्वारे घेणे सहजरीत्या शक्य होते. समुद्र असो वा भूमी; येथील प्रत्येक घटकाची नोंद उपग्रहाद्वारे घेतली जाते. तांत्रिक कारणास्तव काही अडचणी निर्माण होत असतीलही; परंतु मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असते.
महापालिकेसह विमानतळ प्राधिकरणालाही इशारा
मच्छीमारांना आम्ही इशारा देतो; तेव्हा त्याचा फायदा त्यांना होत असतो. असेच इशारे आम्ही रेल्वे, महापालिका आणि तत्सम यंत्रणांना देत असतो. महत्त्वाचे म्हणजे मोनोरेललादेखील आम्ही हवामानाबाबतची माहिती
देत असतो आणि त्याचा संबंधित प्राधिकरणाला निश्चित फायदा होतो.

‘क्लायमेट चेंज’चे लेबल लावू नका : हिवाळा असो वा पावसाळा. प्रत्येक ऋतूत बदल होतात. आपल्याकडे या स्थित्यंतराचे प्रमाण अधिक आहे. असे असले म्हणून त्याला ‘क्लायमेट चेंज’चे लेबल लावू नये. हा विषय वेगळा आहे.

हवामान खाते ‘नोडल एजन्सी’ : पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत हवामान खाते ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहते हवामान खात्याकडून मच्छीमारांसह पालिका आणि खासगी संस्थांना हवामानाची इत्थंभूत माहिती पुरवत असते.

समुद्रामुळे तापमान नियंत्रित राहते : मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन वेधशाळा असून, आणखी तीस स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. अरबी समुद्रामुळे मुंबईचे तापमान नियंत्रित राहत असून, समुद्री वारे मुंबईचे तापमान वाढू देत नाहीत.

(मुलाखत : सचिन लुंगसे)

Web Title: The speed of the temperature rise is risky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.