मेट्रोचे भूसंपादन वेगाने करा, बुलेट ट्रेनची जागा महिनाभरात द्या, मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही जिल्ह्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:12 AM2022-08-30T07:12:04+5:302022-08-30T07:12:33+5:30
Maharashtra Government: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. बीकेसीतील मेट्रो स्टेशनसाठीची जागा ३० सप्टेंबरपर्यंत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतरणाच्या बाबीही पालघर तसेच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मुंबईसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांसह इतर पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी काम करावे. या प्रकल्पांना आवश्यक त्या परवानग्या तातडीने मिळवून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील वॉर रूममधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो, तसेच विमानतळ या कामांबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले.
बुलेट ट्रेनला गती द्या !
मुंबई ते अहमदाबाद हा ५०८.१७ कि.मी. लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प असून त्याला एक लाख आठ हजार कोटींचा येणार आहे. त्यावर १२ स्थानके असून त्यातील चार स्थानके महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील एक स्थानक वगळून उर्वरित तिन्ही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत. एमएमआरडीएमधील ४.८ हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
भूसंपादन वेगाने करा !
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मेट्रो मार्गांच्या कामाचाही आढावा घेतला. यात मुंबई मेट्रो मार्ग- ३, ४, ५, ६, ९, ११, मेट्रो मार्ग २ ए (दहिसर पूर्व ते डी. एन. नगर), मेट्रो मार्ग- ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) यांच्या कामांचा समावेश होता. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग- ४ तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग- ५ या मार्गांसाठी भूसंपादन व हस्तांतराचे काम वेगाने पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
शिवडी-वरळी जोड रस्ता, तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामांना वेग देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून, पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.