विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करा; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:21 AM2022-09-12T06:21:59+5:302022-09-12T06:22:09+5:30
लोकांनी मंत्रालयात येण्याऐवजी आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुंबई : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये, स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
लोकांना आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज देण्यासाठी प्रत्येक वेळी मंत्रालयात यावे लागते. मात्र, स्थानिक पातळीवरच हे स्वीकारण्यासाठी कोकण, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. लोकांनी मंत्रालयात येण्याऐवजी आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महसूल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत संनियंत्रण करीत असून, आलेले अर्ज तसेच त्यावरील कार्यवाही व प्रलंबित अर्ज आदींबाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात.