लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सीबीआयला गुरुवारी केली. आम्ही तसे आदेश देऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. यादरम्यान, सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, या खटल्यातील एकुण ३२ साक्षीदारांपैकी आठ साक्षीदारांची साक्ष विशेष न्यायालयात नोंदवली आहे. त्यामुळे जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही.
न्यायालयानेही सीबीआयचा युक्तिवाद मान्य केला. ‘साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका करण्याचा, प्रश्न येत नाही. आम्ही या अर्जावर सुनावणी घेण्यास बांधील नाही. आम्ही खटल्यावरील सुनावणी जलदगतीने घेण्यास सांगू शकतो. आम्ही हा अर्ज प्रलंबित ठेवतो. परंतु, आमचा जामीन मंजूर करण्याकडे कल नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
१५ सप्टेंबर २०२० रोजी विशेष न्यायालयाने तावडे याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. या निर्णयाविरोधात तावडे याने उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘विशेष न्यायालयाने तांत्रिक कारणे देऊन आपला जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने सारासार विचार केला नाही,’ असे तावडे याने जामीन अर्जात म्हटले आहे.
२० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने तावडेला २०१६ मध्ये अटक केली. दाभोलकरांच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार तावडे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.