मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून, येथील समूह पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली आहे.
अभ्युदयनगर ४ हजार चौरस मीटरवर वसलेले असून, कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नेमणूक म्हाडामार्फत निविदा काढून केली जाईल. एजन्सीच्या नियुक्तीसाठी प्रकल्प व्यवस्थापक, वास्तुविशारद, वित्तीय सल्लागार, प्रकल्प निविदा मागविणे, निविदा अंतिम करणे, येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाचा समितीकडून चार महिन्यांतून एकदा आढावा घेतला जाईल. निविदा पद्धतीने अंतिम केलेल्या बिल्डरला एकूण सभासदांच्या ५१ टक्के संमती पत्रे म्हाडाला सादर करणे बंधनकारक आहे. प्रकल्पातील रहिवाशांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या निवासाची सोय करणे, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पर्यायी जागेचे भाडे देणे, कॉर्पस् फंडासह पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एजन्सीची आहे.
१) मुंबईत परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीकरिता शासनाने म्हाडामार्फत १९५०-६० दरम्यान ५६ वसाहती बांधल्या होत्या.
२) अंदाजे ५ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था यात आहेत.
३) इमारतींचे बांधकाम ५० ते ६० वर्षे जुने झाले आहे.
४) इमारतींच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
तक्रार निवारण समिती स्थापन :
सध्या अस्तित्वात असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकडे जमा असलेला कॉर्पस् फंडाची रक्कम संस्थेतील सभासदांमध्ये वाटली जाईल. नव्या फेडरेशनला देण्यात येणारा सिंकिंग आणि कॉर्पस् फंड किती असावा? हे म्हाडा निश्चित करील. पुनर्विकासात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा परिणाम पुनर्विकासावर होऊ नये म्हणून तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल.