Join us

चक्रीवादळाच्या स्थितीसह गतीही आणखी वेगाने कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:24 AM

डॉप्लर रडारची संख्या वाढणार; हवामानाचा जास्तीतजास्त अचूक अंदाज वर्तविणे शक्य

- सचिन लुंगसे मुंबई : चक्रीवादळ जेव्हा डॉप्लर रडारच्या ४०० किलोमीटरच्या आत येते, तेव्हा डॉप्लर रडारकडून प्राप्त उच्च दर्जाच्या छायाचित्रांद्वारे चक्रीवादळाची स्थिती आणि गतीची माहिती मिळविता येते. आता हवामानाचा आणखी अचूक अंदाज वर्तविण्यासाठी २०२५ पर्यंत ४६ नवे डॉप्लर रडार बसविण्याचे लक्ष्य भारतीय हवामान शास्त्र विभागाने ठेवले आहे. या संख्येत भर पडल्याने एकूण डॉप्लर रडारची संख्या ७५ होईल.सद्यस्थितीत आयएमडी २४, इंडियन एअर फोर्स ३, भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान (आयआयटीएम) पुणे येथे २ डॉप्लर रडार आहेत. उत्तर पश्चिम हिमालय येथे १० एक्स बँड डॉप्लर रडार, मैदानी प्रदेशात ११ सी बँड डॉप्लर रडार, उत्तर-पूर्व राज्यांत १४ एक्स बँड डॉप्लर रडार बसविण्यात येतील. उर्वरित २०२५ पर्यंत बसविण्यात येतील.डॉप्लर रडार बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे हवामानाचा आणखी अचूक अंदाज घेऊन त्यानुसार पुढील उपाययोजना आखणे शक्य होणार आहे. सी बँड डॉप्लर रडारची किंमत ११ कोटी, तर एक्स बँड डॉप्लर रडारची किंमत ६ कोटी आहे. हैदराबाद येथील अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रा.लि.कडून डॉप्लर रडार खरेदी केले जातील.हवामानाचे पूर्वानुमान समजणारडॉप्लर रडार हवामानातील अतिसूक्ष्म लहरींची ओळखपरेड करू शकतो. अतिसूक्ष्म लहरी जेव्हा एखाद्या वस्तूला धडकून परावर्तित होतात, तेव्हा डॉप्लर रडार त्याची दिशा अचूक ओळख शकतो. एका अर्थाने डॉप्लर रडार लहरींच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू शकतो आणि त्यामुळे आपणास हवामानाचे पूर्वानुमान मिळू शकते.कुठे किती पाऊस पडेल हे समजतेअद्ययावत प्रणालीचा वापर करत हवामानाचा अंदाज देण्याचे अंतर तब्बल २०० किलोमीटरहून १२ किलोमीटरवर आणण्यात आले आहे.डॉप्लर-रडारच्या मदतीने पुढील दोन तासांत कुठे, किती पाऊस पडेल, याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यानुसार पुढील उपाययोजना आखणे, धोक्याची सूचना देणे शक्य होणार आहे.पावसाचा इशारा देण्यासाठी मुंबई विभागात सध्या दोन डॉप्लर रडार आहेत. लवकरच ठाण्यात एक, नवी मुंबईत एक आणि मुंबईत दोन रडार बसविले जातील, अशी माहिती हवामान खात्याने दिली.