स्पीडबोट अपघात प्रकरण :‘त्या’ प्रवाशांची शोधाशोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:50 AM2018-10-27T04:50:01+5:302018-10-27T04:50:19+5:30
शिवस्मारकाच्या पायाभरणीला निघालेल्या स्पीडबोटीच्या अपघाताच्या सखोल तपासासाठी कुलाबा पोलिसांनी २३ प्रवाशांचा शोध सुरू केला आहे.
मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीला निघालेल्या स्पीडबोटीच्या अपघाताच्या सखोल तपासासाठी कुलाबा पोलिसांनी २३ प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. त्यांच्या जबाबातून अपघात कसा घडला? या प्रकरणी मुख्य दोषी कोण? आदी बाबींचा तपास करणे सोयीस्कर ठरेल. कारण बचावकार्यानंतर ही मंडळी निघून गेली होती. या व्यक्तींची माहिती आयोजकांकडेही नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
स्पीडबोटचे चालक रुचीत साखरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांनी तो मार्ग खडकाळ असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे पोलिसांना सांगितले. बचावकार्यात २४ जणांना वाचविण्यात आले होते. यातील बहुतांश शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पायाभरणीच्या कार्यक्रमात आमदार, शिवस्मारक प्रकल्पाच्या संबंधित काही अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलिसांना कार्यक्रमाच्या काही तासांपूर्वी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांचाही गोंधळ उडाला होता. तसेच एकूण किती जण यात सहभागी होणार होते याबाबतही पोलीस अनभिज्ञ असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली.
मात्र, या सर्वांची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, स्पीडबोटीच्या परवानगी संदर्भात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा यांच्याशी फोन आणि मेसेजच्या माध्यमाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.
>मेटेंविरोधात तांडेल यांची पोलिसांत धाव
मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलिसांत धाव घेतली. मेटे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहेत.