भरधाव दुचाकीस्वाराने महिलेच्या ओटीपोटात मारली लाथ, दिवसाढवळ्या मुंबईत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 01:06 PM2018-06-14T13:06:35+5:302018-06-14T13:06:35+5:30

महिलेची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून बुधवारी संध्याकाळपर्यंत जवळपास 100 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

Speeding biker kicks woman in abdomen, case viral on Facebook | भरधाव दुचाकीस्वाराने महिलेच्या ओटीपोटात मारली लाथ, दिवसाढवळ्या मुंबईत घडली घटना

भरधाव दुचाकीस्वाराने महिलेच्या ओटीपोटात मारली लाथ, दिवसाढवळ्या मुंबईत घडली घटना

Next

मुंबई- मुंबईमध्ये दिवसाढवळ्या अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने एका 41 वर्षीय महिलेच्या ओटीपोटात लाथ मारून घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी सकाळी पीडित महिला मुलीला शाळेतून घेऊन घरी जात असताना ही घटना घडली.बोरीवलीतील ही घटना असून महिलेने संपूर्ण प्रकार फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितला. तसंच मुंबईमध्ये सकाळच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणीही या महिलेने केली आहे. या महिलेची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली असून बुधवारी संध्याकाळपर्यंत जवळपास 100 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बिस्वप्रिया चक्रबर्ती असं महिलेचं नाव आहे.

'आमचं घर शाळेपासून जवळच आहे. त्यामुळे शाळेतून घरी आम्ही रोज चालतच जातो. सोमवारी (ता. 11 जून ) दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी आम्ही आयसी कॉलनीजवळ पोहोचलो होतो. त्याचवेळी एक दुचाकीस्वार समोरुन येत असल्याचं पाहिलं. तो वेगाने येत असल्याने माझं त्याच्याकडे लक्ष होतं, कारण माझ्यासोबत माझी मुलगी होती. आमच्यापासून काही अंतरावर येताच त्याने वेग कमी केला आणि आपला पाय बाहेर काढला. त्याने अत्यंत जोरात माझ्या ओटीपोटात लाथ घातली. मला लाथ खूप जोरात लागल्याने वेदना होत होत्या. त्यामुळे मी काही पावलं उचलण्याच्या आत त्या दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिली आहे. 

घटनेनंतर तेथे असणाऱ्या  एका रिक्षाचालकाने आणि दुचाकीस्वाराने मला मदत करण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाने त्याचा पाठलाग केला, पण काही वेळाने तो परत आला. दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं त्याने सांगितलं. त्या दुचाकीस्वाराचा हेतू माझी पर्स चोरण्याचा किंवा छेड काढायचा होता का? हे माहिती नाही. चक्रबर्ती यांनी 100 नंबरवर कॉल केला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि महिलेने गाडीचा नंबर पाहिला आहे का, याबद्दल विचारलं. 'नंबर पाहून तो लक्षात ठेवण्याची माझी अजिबात अवस्था नव्हती, असं त्या महिलेने पोलिसांना सांगितलं. त्यांनी जवळपास असलेल्या ठिकाणांवरही चौकशी केली. पण त्याठिकाणी कुठेच सीसीटीव्ही नव्हते’, अशी माहिती बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी दिली आहे. बिसवाप्रिया चक्रवर्ती यांनी यासंबंधी पोलीस तक्रार केली आहे.
दरम्यान, आम्ही दोन पथक तयार केली आहेत. त्या ठिकाणापासून काही अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. त्याची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक जाधव यांनी दिली आहे. 'मी दुचाकीस्वाराचा चेहरा पाहिला असून, पुन्हा एकदा पाहिल्यावर त्याला ओळखू शकते, असं त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Speeding biker kicks woman in abdomen, case viral on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई