Join us

भरधाव कारनं २ कार्यकर्त्यांना उडवले, १ जागीच ठार; गणेशोत्सवात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 5:49 AM

बीएमडब्ल्यू चालक शक्ती हरविंदर अलग हा मुलुंडचाच रहिवासी असून, कॉल सेंटरला नोकरीला आहे.

मुंबई - बाप्पाच्या आगमनाची तयारी जल्लोष सुरू असतानाच मुलुंडमध्ये गणेशोत्सवाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना शनिवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ता प्रीतम थोरातचा जागीच मृत्यू झाला असून, प्रसाद पाटीलची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाला खारघरमधून अटक केली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा येथील मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान येथील आकृती टॉवरजवळ शिडीवर चढून बॅनर लावत होते. त्याच, दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने धडक दिली. या अपघातात दोघेही खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे प्रीतमला मृत घोषित केले तर, पाटीलची प्रकृती गंभीर आहे. बीएमडब्ल्यू चालक शक्ती हरविंदर अलग हा मुलुंडचाच रहिवासी असून, कॉल सेंटरला नोकरीला आहे.

शक्तीची बीएमडब्ल्यू कार असून, गाडी दुरुस्तीसाठी दिली होती. गाडीचे काम झाल्यानंतर विभागात गाडी फिरवून टेस्ट ड्राइव्ह करत असताना त्याने दोघांना उडवले. त्यानंतर, गाडी घराजवळ लावून बाइकने नवी मुंबई गाठली. घटनेची वर्दी लागताच नवघर पोलिसांनी आठ पथके नेमून आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आरोपीला खारघर येथून अटक केली. आरोपीच्या मुलुंड कॉलनी येथील घरातून बीएमडब्ल्यू जप्त करण्यात आली आहे. तो नशेत होता की नाही, याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेत मृत पावलेला प्रीतम हा चालक म्हणून काम करतो. आपल्या कुटुंबासह गव्हणपाडा परिसरात राहतो. तर जखमी असलेला प्रसाद पाटील ही छोटीमोठी कामे करून घर चालवत होता. या घटनेमुळे मुलुंड परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :अपघात