Join us

भरधाव कारने बेस्ट बस, पोलिस व्हॅनला धडक देत चार जणांना उडवले; मुलांची प्रकृती चिंताजनक

By मनीषा म्हात्रे | Published: October 03, 2023 10:03 PM

सीएसएमटी येथील घटना.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : व्यावसायिकाच्या भरधाव कारने बेस्ट बस, पोलिस व्हॅनला धडक देत चार जणांना उडविल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील मॅकडोनाल्डच्या आउटलेटजवळ मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये चार मुले जखमी असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८० वर्षीय व्यावसायिक दिलीप छ्टवानी याला अटक केली आहे.

या अपघातात विजय रामवध राजभर (१८, रे रोड), सादाब अन्सारी (१७), अजय गुप्ता (१८) आणि शिवडीत जयभीम नगर परिसरात राहणारा १८ वर्षीय प्रवीण जखमी झाला आहे. चौघेजण फुटबॉल खेळण्यासाठी आले होते. घरी परतण्यासाठी सीएसएमटी स्थानकाच्या दिशेने जात असताना सायंकाळी साडे सात वाजता हा अपघात घडला आहे. सीएसएमटी सारख्या वर्दलीच्या भागात घडलेल्या या अपघाताने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप हे महिमचे रहिवासी असून त्यांचा मस्जिद बंदर परिसरात मेटल ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. 

मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता दिलीप हे टाटा टियागो कारने भरधाव वेगाने सीएसएमटी स्थानकासमोरील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून यू-टर्न घेत असताना त्यांचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनवर धडकण्यापूर्वी बेस्ट बसला धडक दिली. याच दरम्यान चारही मुले कुलाबा येथे फुटबॉल खेळून परतत असताना दिलीप यांच्या कारने त्यांचा फरफटत नेले. यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. चारही मुले शिक्षण घेत आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. 

टॅग्स :अपघात