Join us

पन्नास वर्षे नरकयातना भोगली; आता आमच्या मुलाबाळांना तरी सुखात राहू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 12:51 PM

खेरवाडी, निर्मलनगर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांची मागणी

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आमची बिल्डिंग पाडल्यानंतर हक्काचे घर सोडून आम्ही म्हाडा संक्रमण शिबिरात गेली पन्नास वर्षे नरकयातना भोगत आहोत. आमची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. आमच्या मूळ भागात बिल्डर ५५० चौ. फुटांची घरे देतो, तरीही आम्ही इतकी वर्षे संक्रमण शिबिरातच असून, आता आम्ही राहत असलेल्या उपनगरात तरी ५५० चौ. फुटांचे मालकी हक्काची घरे द्या, आमच्या मुलाबाळांना तरी सुखात राहू दे, आमचा घराचा वनवास संपवा, अशी आर्त मागणी खार निर्मलनगर म्हाडा संक्रमण शिबिर ९ आणि १० मधील मूळ रहिवाशांनी केली आहे.

खार ( पूर्व ) खेरवाडी, निर्मल नगर येथे १९७२ साली तेव्हाच्या मुंबई बोर्डाने तीन संक्रमण शिबिरे उभारली होती. त्यापैकी एक शिबिर पाडले गेले आहे. आता म्हाडा संक्रमण शिबिर ९ व १० च्या इमारती आहेत. यात संक्रमण शिबिर ९ मध्ये ४० तर संक्रमण शिबिर १० मध्ये ३० कुटुंबे आहेत. हक्काच्या घराची सोनेरी स्वप्ने पाहात येथील एक पिढी संपली. किमान आमच्या मुलाबाळांना तरी सुखात राहण्यासाठी हक्काचे घर मिळेल या अपेक्षेने रहिवाशी दिवस ढकलत आहेत.

मूळ मालकांना घर हवे  

संक्रमण शिबिरात घुसखोर भाडेकरूही असून त्यांना संक्रमण शिबिरातच पक्के घर हवे आहे, मात्र हा सारा प्रकार म्हाडा अधिकाऱ्यांशी संगनमताने झालेला वाटत नाही का, असा सवाल आहे. यासाठीच मूळ संक्रमित रहिवाशांना हक्काचे घर द्यावे, ते घर शिबिरात नको, असेही रहिवाशांनी म्हाडाला कळवले आहे.

संक्रमण की यातना?

- १९७२ पासून शिबिराची केवळ २ वेळाच डागडुजी झाली.  - शिबिराच्या छपराला गळती आहे. खिडक्या दारे खिळखिळीत. - साफसफाई व सुरक्षिततेचा अभाव, कुटुंबे वाढली, जागा कशी पुरणार? - दूषित पाणीपुरवठा, गटारे तुंबल्याने रोगराईचा प्रादुर्भाव- शिबिरांसाठी कोटींचा पैसा खर्च झाला असे म्हाडा सांगते. मग शिबिराची अशी अवस्था का ? शिवाय इमारत पुन्हा बिल्डरच्या घशात का घालता ? असा रहिवाशांचा प्रश्न आहे.  

दूषित पाणीपुरवठा

- निर्मलनगर संक्रमण शिबिराच्या पिण्याच्या पाईपलाईनची प्रचंड दुरवस्था आहे.  - या पाईपलाईन वर रानटी झाडे उगवली असून येथील गटाराचे पाणी पाईपलाईन मध्ये शिरते. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा संपूर्ण संक्रमण शिबिराला होत आहे. - शिवाय येथेच गटारात तुंबलेल्या पाण्यामुळे डास आणि मच्छरचा धोकाही रहिवाशांना निर्माण झाला आहे. - तेव्हा पिण्याच्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती आणि येथे साफसफाई व्हावी, अशी मागणी संक्रमण शिबिरातील रहिवाशी राजू साटम आणि गायकवाड यांनी आहे.

 

टॅग्स :मुंबईम्हाडा