स्पाईस जेटच्या मालकाला गो-फर्स्टच्या खरेदीत रस
By मनोज गडनीस | Published: February 16, 2024 05:08 PM2024-02-16T17:08:18+5:302024-02-16T17:09:37+5:30
आर्थिक गर्तेत गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या मे महिन्यापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या खरेदीत आता स्पाईसजेट कंपनीच्या मालकांनी रस दाखवला आहे.
मनोज गडनीस, मुंबई : गो-फर्स्ट कंपनीच्या ताफ्यात असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त विमानांत तांत्रिक दोष निर्माण झाल्यानंतर आर्थिक गर्तेत गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या मे महिन्यापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या खरेदीत आता स्पाईसजेट कंपनीच्या मालकांनी रस दाखवला आहे. गो-फर्स्ट कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर संबंधित प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. दिवाळखोरीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने कंपनीने आता कंपनीच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती देखील जारी केली आहे.
त्यानुसार, स्पाईसजेट कंपनीचे मालक अजय सिंग यांनी बिझी बी एअरलाईन कंपनीसोबत वैयक्तिक पातळीवर गो-फर्स्टच्या खरेदीमध्ये रस दाखवला आहे. गो-फर्स्ट कंपनी कार्यरत असताना कंपनीच्या विमानांची देशातील सर्व प्रमुख शहरांशी जोडणी होती. तसेच, कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय होती. त्यामुळे सध्या देशात विमान उद्योगात असलेली तेजी विचारात घेता जर गो-फर्स्ट कंपनीचे पुर्नरुज्जीवन झाले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकणार आहे. त्यामुळे कंपनीच्या खरेदीत सिंग यांनी रस दाखवला आहे.