Spicejet ची विमाने वादात! विंडशिल्ड तडकली, आता मुंबईत इमरजन्सी लँडिंग; 17 दिवसांत सात घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:45 PM2022-07-05T19:45:06+5:302022-07-05T19:45:29+5:30
डीजीसीएनुसार कांडला-मुंबई विमान २३ हजार फुटांवर असताना विंडशिल्डला तडा गेला. यामुळे हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरविले गेले.
स्पाइसजेट (SpiceJet) ची विमाने वादात साप़डली आहेत. सकाळीच एका फ्लाईटला पाकिस्तानात उतरववावे लागल्याचा प्रकार ताजा असताना सायंकाळी मुंबईत आणखी एका स्पाईस जेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे.
डीजीसीएनुसार कांडला-मुंबई विमान २३ हजार फुटांवर असताना विंडशिल्डला तडा गेला. यामुळे हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरविले गेले. विंडशिल्डचा बाहेरील भाग तुटला होता. गेल्या १७ दिवसांत स्पाईस जेटच्या विमानात अशाप्रकारच्या तांत्रिक समस्या निर्माण होण्याची ही सातवी घटना आहे. आजच अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. स्पाईसजेटची एक फ्लाईट कराचीमध्ये उतरविण्यात आली. याचबरोबर गेल्या पाच घटनांची चौकशी सुरु आहे.
SG-11 हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. यावेळी तांत्रिक समस्या आल्याने ते अचानक कराचीला वळविण्यात आले. विमानाच्या इंडिकेटरमध्ये समस्या आल्याचे कारण देण्यात आले होते. या प्रवाशांना दुबईला पोहोचविण्यासाठी दुसरे विमान कराचीला पाठविण्यात आले होते. फ्युअल टँकचा इंडिकेटर आतमध्ये इंधन असताना देखील कमी असल्याचे दाखवत होता. विमानाची तपासणी केली गेली, तेव्हा टाकी कुठेही लीक नव्हती. परंतू तरी देखील इंडिकेटर खाली आला होता. यामुळे हे विमान कराचीला उतरविण्यात आले होते.