स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम
By मनोज गडनीस | Published: February 12, 2024 06:27 PM2024-02-12T18:27:02+5:302024-02-12T18:27:32+5:30
कंपनीच्या ताफ्यात सध्या ३० विमाने असून एकूण नऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत
मनोज गडनीस, मुंबई: परवडणाऱ्या दरातील विमान सेवा देणारी कंपनी अशी ओळख असलेल्या स्पाईसजेट कंपनीची आर्थिकस्थिती नाजूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच कंपनीतून १४०० कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. एकिकडे अन्य विमान कंपन्यांमध्ये विस्तार व भरती प्रक्रिया सुरू असताना स्पाईसजेट कंपनीत मात्र कर्मचारी कपात करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात सध्या ३० विमाने असून एकूण नऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी वर्षाकाठी कंपनी ६० कोटी रुपयांचा खर्च करत असल्याची माहिती आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत कंपनीत आर्थिक समस्या निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक देय अद्याप मिळालेले नाही तसेच काही कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन देखील मिळाले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याची देखील माहिती आहे.