मुंबई/ठाणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम राबवत महापे येथून हलक्या प्रकारचे २७ लाखांहून अधिक किमतीचे गरम मसाले जप्त केले. घरोघरी फोडणीत, जेवणात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांतही भेसळ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यावर तारखाही नव्हत्या. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.महापेच्या मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये केलेल्या कारवाईत हळद २९६ किलो, धणे पावडर ३,९९८ किलो, मिरची पावडर ६४९८ किलो, जिरे पावडर ५,४५४ किलो, तसेच करी पावडर २,४९८ किलो असा २७ लाख ३९ हजारांचा अन्नपदार्थांचा साठा कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. हे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आले असून अहवाल येताच कायदेशीर कारवाई घेण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी दिली. ही कार्यवाही राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी अशोक पारधी, सहायक आयुक्त (अन्न), ठाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
ट्रेनिंग गरजेचेप्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने ठरवल्यानुसार २५ कामगारांमागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत फास्ट ट्रॅक ट्रेनिंग द्यावे. उत्पादक, आयातदार, वितरक यांनी कोणतेही अन्नपदार्थ विनापरवाना किंवा विनानोंदणी खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विकू नये, असेही देशमुख यांनी सांगितले.
इथे करा तक्रारअन्न आस्थापनांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी.