मुंबई : मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. हे खड्डे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डा चुकवताना होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहे.२०१६ ते २०१९ या काळात मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकूण १० हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईत रस्ते मार्गांवरील रोज ६ प्रवासी खड्डेबळी ठरत आहेत, असा अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिला होता. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये वाढ झाली असून, २ हजार १४० प्रवाशांना खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. २०१८ मध्ये २ हजार १५ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर २०२० चा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. दरवर्षी जून-जुलैमध्ये मुसळधार पाऊस कोसळताच मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा होते. चेंबूर ते सीएसएमटी, वांद्रे ते दहीसर, कुर्ला ते ठाणे या मुख्य रस्त्यांसह, लालबहादूर शास्त्री मार्ग, शहरातील अंतर्गत जोडरस्ते, गल्ल्या, स्थानिक विभागातील छोटे-मोठे रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. रस्तेच नव्हे तर उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. पेव्हर ब्लॉकचे रस्तेही ठिकठिकाणी खचल्याचे आढळून आले. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होत आहेत. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर पसरलेल्या खड्ड्यांतील डांबरमिश्रित खडीमुळे दुचाकींचे अपघात होऊ लागले आहेत. शिव-भायखळा मार्गावरील परळ पुलावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरच्या पुलाचीही हीच अवस्था आहे. शिव, धारावी, दादर, परळ, लालबाग, भायखळा, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, डी. एन. नगर, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी आदी ठिकाणच्या रस्त्यांची वाताहत झाली आहे. गोरेगाव येथील मृणालताई गोरे मार्गाकडे जाणारा रस्ता, ओशिवरा ते डी. एन. नगर मार्ग, मुलुंड चेकनाका या परिसरातील नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. पालिकेसह सर्वच सरकारी यंत्रणेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची कामे हाती घेतली जातात.
मुंबईकरांसाठी खड्डे ठरताहेत डोकेदुखी; मणक्याचे आजार, अपघातांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 7:43 AM