Join us

खड्ड्यांमुळे मणक्यांचा झाला खुळखुळा; बॅड पॅचेससाठी ८४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 2:42 PM

नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

मुंबई :  गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण होत आहे; मात्र पावसाळ्यात या सिमेंटच्या रस्त्यावर जागोजागी पडत असलेल्या खड्ड्यांनी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार मुंबईत तब्बल १४ हजार ८१७ खड्ड्यांचे साम्राज्य आहे. राज्य सरकार आणि पालिकेने येत्या दोन वर्षांत मुंबईचे काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त रस्ते करण्याचा निर्धार केला आहे. पुढील दोन वर्षांत ४०० किमी रस्तेबांधणीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, या कामासाठी सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहेत. बॅड पॅचेससाठी ८४ कोटीपालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामे सुरू असताना आता रस्त्यांवरील बॅड पॅचेस बुजविण्यासाठी प्रभागनिहाय निधीची तरतूद करण्यात आली आहे. वॉर्ड अधिकारी मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. दरम्यान, ही कामे येत्या ३० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दुचाकीचालक असो की, चारचाकी चालक, अशा रस्त्यावरून ये-जा करताना मणक्याच्या गादीला झटका बसून गादी सरकू शकते. अशा रस्त्यांच्या परिसरातील रहिवाशांना तेथून वारंवार ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. चिंताजनक म्हणजे गरोदर मातांना त्याचा अधिक धोका आहे.    - डॉ. यशवंत गाडे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि अस्थिरोगतज्ज्ञ

एवढ्या ठिकाणी पालिकेने बुजवले खड्डे    शहर -    ११,७९२    पश्चिम उपनगर -    ११,०८४    पूर्व उपनगर -       १०,९१५

अटेंड केलेले खड्डे    चौरस मीटरपालिका    ३३,७९१    ५१८५२.०२६२ कंत्राटदार    १३,५०१    ९६२६८.३४७ सेंट्रल एजन्सी    १,३१६    -

आजही खड्ड्यांचे साम्राज्य - मुंबई पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार १ एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत खड्ड्यांच्या ४८ हजार ६०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. - त्यापैकी मार्च २०२३ अखेरपर्यंत ३३ हजार ७९१ खड्डे कोल्डमिक्स व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात तब्बल १४ हजार ८१७ खड्ड्यांचे साम्राज्य आजही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागणार आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातील खड्ड्यांची आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईखड्डे