गेल्या हजार-बाराशे वर्षांच्या इतिहासात भारताचा आत्माच दिसत नाही - पाण्डेय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 11:50 PM2020-03-04T23:50:01+5:302020-03-04T23:50:09+5:30
देशाच्या गेल्या हजार-बाराशे वर्षांत लिहिल्या गेलेल्या इतिहासात भारताचा आत्मा कुठेच दिसत नाही.
मुंबई : देशाच्या गेल्या हजार-बाराशे वर्षांत लिहिल्या गेलेल्या इतिहासात भारताचा आत्मा कुठेच दिसत नाही. जो इतिहास लिहिला गेला तो आधी मोगलांची राजवट आणि नंतर पोर्तुगीज व ब्रिटिशांची राजवट बळकट करण्याच्या हेतूने लिहिला गेला असे प्रतिपादन अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. बालमुकुंद पाण्डेय यांनी केले.
इतिहास संकलन समिती कोकण प्रांत (बोरीवली भाग) यांच्या वतीने बोरीवलीतील सोडावाला शाळेमध्ये आयोजित ‘वर्तमान संदर्भात भारताचा इतिहास’ या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, त्या इतिहासात भारत व भारतीय समाजातील दोष, उणिवा आणि कालबाह्य रूढी व परंपरा यांच्यावरच भर दिला गेला. भारतीयांचे शौर्य, पराक्रम, त्याग, विविध ज्ञानशाखांतील विद्वत्ता अशा गुणांकडे योजनापूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम म्हणून या काळात शिकूनसवरून मोठ्या झालेल्या बहुतेकांच्या मनात (काही अपवाद वगळता) आपला भारत देश, समाज, संस्कृती, इतिहास यांच्याबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला.
अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गिरीश ठाकर यांनी प्रस्तावना करताना आपल्या राष्ट्राचा मूळ इतिहास समजून घ्यायचा असेल तर वेद, उपनिषदे, पुराणे व रामायण-महाभारतातील महापुरुषांच्या व स्त्रियांच्या जीवनाचा, संतांचा, समाजसुधारकांचा व वैज्ञानिकांचा अभ्यास केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. याप्रसंगी विशेष निमंत्रित असलेले जैन मुनी श्री प्रशमरत्न विजयजी महाराज उद्बोधनात म्हणाले, आपला धर्म, संस्कृती व इतिहास यांची नीट जाणीव करून देण्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था आपल्या मातृभाषेतून शिक्षण व संस्कार देणारी असली पाहिजे.