दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप

By admin | Published: October 23, 2015 03:26 AM2015-10-23T03:26:30+5:302015-10-23T03:26:30+5:30

नवरात्री जागवल्यानंतर अखेर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांनी गुरुवारी दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप दिला. डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंनी दुर्गादेवीला पुढच्या वर्षी लवकर

Spiritual Message to Durgadevi | दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप

दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप

Next

मुंबई : नवरात्री जागवल्यानंतर अखेर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांनी गुरुवारी दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप दिला. डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंनी दुर्गादेवीला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी भक्त करत होते. आगमन सोहळ्याप्रमाणेच देवीचा विसर्जन सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
गिरगाव, दादर, जुहू चौपाटीसह महत्त्वाच्या विसर्जनस्थळांवर भक्तांनी बऱ्यापैकी गर्दी केली होती. एकाच रंगाचा सदरा-लेंगा, साड्या, कुर्ते घालून पारंपरिक वेशभूषेमध्ये भक्त दिसत होते. उडत्या गाण्यांसोबतच गरब्याच्या तालावर तरुणाईनेही फेर धरला. त्यात ‘शांताबाई’ भलतीच भाव खाऊन गेली. तर रावण दहन करणाऱ्या चिंचपोकळी येथील आनंद इस्टेटमध्ये पुणेरी ढोल ताशांनी उपस्थितांची मने जिंकली.
भायखळ्यातील ‘गिरणगावची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘डी.पी. वाडीची माउली’ची विसर्जन मिरवणूक तर दुपारी कडक उन्हात सुरू झाली. मात्र तरीही तरुणांसह प्रौढ भक्तांनी गर्दी केली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शुभ्र रंगाचा सदरा, तर महिलांनी एकाच रंगाच्या साड्या नेसल्या होत्या. त्यामुळे मंडळाची एकजूट दिसत होती. संपूर्ण गिरणगावाची देवी म्हणून डी.पी. वाडीच्या माउलीचा नावलौकिक आहे. सायंकाळी सात वाजता गर्दीची माफी मागत विसर्जन मिरवणूक थांबवण्यात आली. मात्र विभागातील तरुणाईचा हिरमोड होऊ नये, म्हणून पुढील वर्षी रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू ठेवण्याचे आश्वासन मंडळाचे अध्यक्ष अशोक विचारे यांनी दिले.
त्यानंतर सर्वच भक्तांनी गिरणगावच्या राणीला पुढील वर्षी लवकर येण्याची विनंती करत अखेरचा निरोप दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Spiritual Message to Durgadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.