मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणात खेकड्यांची फार मोठी अडचण आहे. त्यातूनच धरणाला गळती लागली, असा अजब दावा करत काही गोष्टी विधीलिखीत असतात. त्यामुळे शिवसेनेच्या आमदाराला दोष देणे योग्य होणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी येथे दिले. जलसंधारण मंत्र्यांच्या या उत्तरावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे.
रत्नागिरीतील तिवरे धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केले आहे. या कामाबाबत स्वत: जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साशंकता व्यक्त करत कालच्या दुर्घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल बोलता सावंत म्हणाले, 2002 ला हे धरण पूर्ण झाले. आज 15 वर्षे त्या ठिकाणी पाणी साठते. आत्तापर्यंत काहीच झाले नाही. मात्र, अलीकडच्या काळात या धरणात खेकड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली. त्यातून गळती झाल्याचे निदर्शनास आले. ही गळती बंद करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले होते. सावंत यांच्या या उत्तराला समाचार अजित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन घेतला आहे. जर उंदीर अन् खेकडे जबाबदार असतील तर मग तुम्ही मंत्रीपद का घेतलं ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. सरकारच्या निष्क्रियतेचं खापर प्राण्यांवर का फोडता ? असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
''कालवा फुटला तर उंदीर जबाबदार,धरण फुटलं तर खेकडे जबाबदार! मग मंत्रीपद का घेतलं?भाजपा-सेनेचे मंत्री स्वतःचं अपयश केव्हा मान्य करणार?लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून जीवाशी खेळणारे हे, सरकारच्या निष्क्रियतेचं खापर प्राण्यांवर फोडतायत!'' असे ट्विट अजित पवार यांनी केलं आहे.