मुंबई : रस्त्यात थुंकल्याने एका पादचाऱ्याला कोठडीची भीती घालून त्याच्याकडून पाच हजार रुपये उकळल्याचा प्रकार मलबार हिल परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.येथे तोतया पालिका क्लीनअप मार्शलची टोळी कार्यरत असून, ते नागरिकांना धमकावून पैसे उकळतात. मलबार हील येथील रहिवासी अनंत मोरे (४४) हे रविवारी रस्त्यावरून जात असताना एकाने त्यांना हटकले व पालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगित ‘तुम्ही रस्त्यावर थुंकलात. त्यामुळे २५ हजार रुपयांचा दंड व ६ वर्षांचा तुरुंगवास होणार,’ अशी भीती घातली. थुंकलो नसल्याचे सांगत मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला. पोलिसांना बोलाविण्याची भीती घालून त्याने त्यांच्याकडून ५ हजार रुपये उकळले.मोरे यांनी घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, मोरे यांनी मलबार हील पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
रस्त्यात थुंकल्याने कोठडीची भीती घालत उकळले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 6:00 AM