Join us

सर्व सामग्री असूनही रुग्णांची ससेहोलपट

By admin | Published: August 03, 2015 2:48 AM

रुग्णालयात रक्त तपासणीची सर्व सामग्री असतानाही चेंबूरच्या माँ रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना खासगी लॅबचा रस्ता दाखवत आहेत.

मुंबई : रुग्णालयात रक्त तपासणीची सर्व सामग्री असतानाही चेंबूरच्या माँ रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना खासगी लॅबचा रस्ता दाखवत आहेत. याबाबत वरिष्ठांना रुग्णांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र त्यांच्याकडून काहीही कारवाई होताना दिसत नाहीचेंबूर, मानखुर्द आणि गोवंडीतील रहिवाशांसाठी शताब्दी रुग्णालयानंतर माँ रुग्णालय हे सर्वांत जवळचे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात रोजच हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात. गेल्या काही वर्षांत या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी पालिकेने सर्व अद्ययावत मशिन्स याठिकाणी आणल्या. तसेच रक्त तपासणीच्या देखील सर्व सुविधा रुग्णालयात आहे. मात्र सीबीसी, ब्लड शुगर आणि क्रिएटिनिन या तीन रक्त चाचण्या सोडल्यास याठिकाणी कुठल्याच रक्त चाचण्या केल्या जात नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे रुग्णालयात सर्व चाचण्या केल्या जात असल्याचे फलक लावलेले आहेत. त्यामुळे काही गरीब रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात रक्त तपासणीसाठी येतात. मात्र मशिन्स खराब असल्याचे कारण सांगून कर्मचाऱ्यांकडून त्यांना नकार देण्यात येतो.काही कर्मचारी तर त्यांना चेंबूर परिसरातील खासगी लॅबचे नाव सुचवून त्याठिकाणी पाठवतात. या कर्मचाऱ्यांना लॅब चालकांकडून कमिशन मिळत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. तर यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याने तक्रारी करुन देखील याठिकाणी कोणावरही कारवाई केली जात नाही.रुग्णालयात ज्या तीन चाचण्या केल्या जातात. त्यासाठीही रुग्णांना ३ ते ४ तास वाट पाहावी लागते. सकाळी ८ वाजता रुग्णालयातील रक्त चाचण्या सुरु करण्याची वेळ आहे. मात्र रक्त चाचणी करणारे कर्मचारी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत येत असल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात ताटकळत राहावे लागत आहे. शिवाय लॅबमधील कर्मचाऱ्यांकडून नेहमीच उर्मट वागणूक मिळत असल्याची माहिती देखील एका रुग्णाने दिली आहे. (प्रतिनिधी)