मीरा भाईंदर, दि. 11 - चुकीची धोरणे राबवून ज्या शिवसेनेने मराठी माणसाला मुंबईबाहेर काढले, त्याच स्थलांतरीतांच्या भरवशावर आता शिवसेना मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढू पाहात असल्याची टीका भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केली आहे. तसेच मराठी माणसाच्या हक्काची भाषा करणाऱ्या शिवसेनेने फक्त वडापावच्या अवैध गाड्या उभारण्या व्यतिरिक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काय केले, असा सवालही त्यांनी यावेळी केला.मराठी माणसाच्या हक्काचे जणू आपण एकमेव कैवारी असल्याचा दावा करून शिवसेनेने आजवर राजकारण केले. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेने त्याच मराठी माणसाचे अतोनात नुकसान केले. बड्या बिल्डर्सशी संगनमत करून मुंबईतील मराठी माणसांची घरे बिल्डर्सच्या घशात घालणास भाग पाडले गेले. परिणामी नाईलाजास्तव हा मराठी माणूस नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, विरार, पनवेल, तसेच मीरा भाईंदर या भागात स्थलांतरित झाला. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात स्थलांतरित झालेल्या याच मराठी माणसांच्या भरवशावर आता शिवसेना स्वबळाची भाषा करत असल्याबद्दल मेहता यांनी संताप व्यक्त केला. ज्या मराठी माणसाला आपण मुंबईतून हद्दपार केले, त्यांच्याकडे आता शिवसेना कोणत्या तोंडाने मत मागायला जाणार, असा उद्विग्न सवालही त्यांनी यावेळी केला.याशिवाय रोजगाराच्या नावाखाली शिवसेनेने मराठी तरूणांना अवैध वडापावच्या गाड्या उभारून देण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही. आपल्या राजकारणासाठी बेरोजगार तरूणांना राडेबाजी करण्यास शिवसेना नेतृत्वाने कायमच उद्युक्त केले, असा टोला नरेंद्र मेहता यांनी लगावला.मीरा भाईंदर महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी शिवसेनेकडे कोणताही ठोस अजेंडा नाही. म्हणूनच शिवसेनेच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला आता मराठी माणून भुलणार नाही, असा दावा करत या निवडणूकीत मतदार राजा शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अवैध वडापावच्या गाड्यांशिवाय शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले? - भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 7:11 PM