Join us

Eknath Shinde: शिवसेनेत उभी फूट? हे आमदार,मंत्री नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:01 AM

Eknath Shinde News: विधान परिषद निवडणुकीत भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेतील वजनदार नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुंबई - विधान परिषद निवडणुकीत भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेतील वजनदार नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षातील दुजाभाव महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, काल विधान परिषद निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले अनेक आमदार नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची नावं समोर आली आहेत.

शिवसेनेच्या नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची नावं समोर आली आहेत. त्यामध्ये शहाजीबापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, संजय राठोड, प्रताप सरनाईक, संजय सिरसाट, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, संजय रायमुलकर आणि प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. दरम्यान, नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतीलच असे नाही. मात्र या आमदारांपैकी नेमके किती आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांनुसार सुमारे १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेराजकारण