मुंबई : गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. हा काळ मोठा कठीण आहे. कारण या काळात आरोग्याच्या विशेषत: रक्ताच्या तुटवड्याच्या अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रक्ताचा असा तुटवडा भासू नये आणि समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो या भावनेने कांजूरमार्ग आणि आसपासच्या रहिवाशांनी एकत्र येत रक्तदान केले; निमित्त होते ते लोकमत समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान मोहिमेचे. विघ्नहर्ता श्रीगणेशाला वंदन करून सुरू झालेल्या या रक्तदानाच्या महायज्ञात सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत ४२ रक्तदात्यांनी रक्तदानासाठी येथे उपस्थिती लावली.
स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत समूहाने २ ते १५ जुलैदरम्यान महाराष्ट्रात आयोजित केलेल्या लोकमत रक्ताचं नातं या रक्तदान मोहिमेअंतर्गत कांजूरमार्ग पश्चिम येथील एमएमआरडीए वसाहतीमध्ये कांजूरचा विघ्नहर्ता गणेश मंदिर परिसरात स्वाभिमानी भारतीय पँथर कामगार संघटनेच्या सहयोगाने रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ या काळात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी भारतीय पँथर कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश कुराडे, शीतल कुराडे, मिलिंद साळवे, रोहित कांबळे, प्रवीण नांगरे, सुनील मगरे, दत्तू वाघचौरे, विजय जयस्वाल, अनिकेत त्रिभुवन, सचिन गायकवाड, गणेश नांगरे, रोहन मुदगल, जी. आर. कुराडे, रावसाहेब कुराडे, संभाजी कुराडे, संजय पवार, कृष्णा आखाडे, दिलीप केशकामत, कल्पेश पटेल, संतोष शिरसाट, असर्फी लाल यादव यांनी उपस्थिती दर्शविली.
रक्तदान शिबिराला मुंबई पोलीस परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम (आय. पी. एस.), मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर, मुंबई पोलीस पार्क साईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झुबदा शेख, कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद ओव्हाळ, मानखुर्द वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, महावितरणच्या भांडूप विभागाचे सांगळे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारत परीक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता किरण खंडेपारकर यांनीदेखील लोकमतच्या रक्तदान मोहिमेला संदेशाच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
येथे रक्तदान केल्यानंतर ज्योती शहा यांनी सांगितले, लोकमतने आयोजित केलेल्या रक्तदान मोहिमेत मला सहभागी होता आले, याचा आनंद आहे. आज आपण आरोग्याच्या एका मोठ्या संकटाशी सामना करीत आहोत. अशावेळी लोकमतच्या माध्यमातून अंकुश कुराडे यांनी येथे रक्तदानासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले; याचा देखील आनंद आहे. मिलिंद साळवे आणि रोहित कांबळे यांनीदेखील रक्तदान केल्यानंतर अभिमान वाटला, अशा भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, मुंबई सेंट्रल येथील मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाचे डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. रक्तदान करण्यासाठी आरोग्य कसे सुदृढ लागते ? याबाबत मार्गदर्शन केले. याव्यतिरिक्त रक्तदान केल्यानंतर काय काळजी घ्यावी ? याबाबतीत मार्गदर्शन केले.