Join us  

कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत

By admin | Published: March 19, 2015 12:39 AM

महाराष्ट्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जे. जे. स्कू ल आॅफ आर्ट या ख्यातकीर्त कला शिक्षण संस्थेसाठी दहा क ोटी रुपयांची तरतूद केली.

सरकारचे अभिनंदन : जे.जे. स्कूलला १० कोटी मंजूरमुंबई : अभिजात कला शिक्षणाकडे पाहण्याचा शासनकर्त्यांचा दृष्टिकोन अनास्थेचा असावा, अशी भावना दृढमूल होऊ लागली असतानाच महाराष्ट्र सरकारने बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जे. जे. स्कू ल आॅफ आर्ट या ख्यातकीर्त कला शिक्षण संस्थेसाठी दहा क ोटी रुपयांची तरतूद केली. सरकारच्या या कृतीकडे सुखद धक्का म्हणून पाहणाऱ्या कला क्षेत्रातील आघाडीच्या दिग्गजांनी या तरतुदीचे मन:पूर्वक स्वागत केले आहे. सरकारचे हे पाऊल स्वागतार्ह आणि आनंददायी असल्याची भावना नोंदविणाऱ्या कलोपासकांनी या निधीच्या विनियोगाबद्दल काही ठळक सूचनाही केल्या आहेत. वासुदेव कामत : अर्थसंकल्पात पहिल्यांदाच चित्रकलेचा इतका विशेषत्वाने विचार झाल्याचे मी पहिल्यांदा ऐकतो आहे. ही आनंदाची बाब आहे. प्रश्न या निधीचा प्रत्यक्ष विनियोग कुठे होणार हा आहे. इमारत-परिसर, शिक्षक वर्ग की शिक्षणाच्या अन्य सोयीसाठी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. माझ्या मते जे. जे. स्कूलमधील १८५७ पासूनचा कलासंग्रह संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करायचा झाला तरी हा निधी अपुरा पडेल. विनियोगाच्या बाबतीत प्राथम्यक्रम ठरवायचा तर कलाकृतींचा संग्रह जतन करणे, कला संचालनालय अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत करणे याला अग्रक्रम हवा. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे कलावंतांच्या जाणिवा समृद्ध करणारे एक प्रेरणास्थळ - डीनचा बंगला जे.जे.च्या आवारात आहे. त्या वास्तूचं पुनरुज्जीवन करून हा इतिहास जपायला हवा. सुहास बहुळकर : ही बातमी ऐकली आणि इतकी वर्षे केलेल्या संघर्षाला फळ आल्याचा आनंद झाला. चित्रकार मंडळी बक्कळ पेसा मिळवतात, त्यामुळे त्यांनीच या मातृसंस्थेला अर्थसाह्य करावे, त्यासाठी सरकारकडे पैसानाही, अशी भूमिका घेणाऱ्या नोकरशाहीशी विसंगत भूमिका सरकारने घेतली, याचा आनंद आहे. पण आता या निधीच्या विनियोगासाठी माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांच्यातून तज्ज्ञ समिती नेमायला हवी. विनियोगाचा प्राधान्यक्रम जाणकारांनीच ठरवायला हवा. आशिष विळेकर : एक कला शिक्षक या नात्याने ही खूपच आनंद देणारी बातमी आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, काळाच्या बरोबर धावण्यासाठी याची गरज होती. अप्लाइड आर्टसारख्या क्षेत्रात हा निधी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा ठरेल. यातून विद्यार्थ्यांना खूप नव्या गोष्टी हाताळायला मिळाल्या तरी ते खूप मोलाचे ठरेल. प्रा. मनीषा पाटील : हा स्वागताचा मुद्दा आहे. पूर्णवेळ शिक्षकांचा अभाव, ग्रंथालय अद्ययावत करण्याची गरज आदी प्रलंबित बाबी यातून मार्गी लागल्या तर ते संस्थेच्या हिताचेच ठरेल. अभ्यासक्रम अपडेटसाठीही हा निधी वापरता येईल.मधुकर वंजारी : जे.जे. स्कूलला सरकारने इतका निधी दिला, ही आनंदाची बाब आहे. कला शिक्षणाचे क्षेत्र अनुत्पादक आहे, अशा भूमिकेतून राज्यकर्ते एकूणच कलेच्या बाबतीत उदासीन आहे का, या प्रश्नाला सरकारने कृतीने छेद दिला, हे स्वागतार्ह आहे. जे.जे.ची प्रवेश क्षमता अनेक वर्षे मर्यादित आहे. ती वाढायला हवी. जे.जे.चा विस्तार आणि विकास अगत्याने व्हायला हवा. या तरतुदीमुळे संस्थेच्या भविष्यकालीन विकासाच्या आखणीला बळ मिळणार आहे.ही आनंदाची बाब आहे. पण अशी तरतूद करीत असताना कला शिक्षणाचा कारभार तंत्रशिक्षण संचालनालयाकडून काढून घेऊन त्याची स्वतंत्र व्यवस्था करायला हवी. कला शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ते आवश्यक आहे. अर्थात अशी स्वतंत्र तरतूद केल्याबद्दल मी राज्य सरकारचे विशेष अभिनंदन करतो. - खा. विजय दर्डातरतूद केली हे तर ठीक झाले. पण याचा विनियोग कशासाठी होणार हे महत्त्वाचे आहे. जे.जे. मधील वातावरण कलामय होणे, चित्रकला आणि इतर अभिजात कलांसाठी पोषक होणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी प्रत्येक विद्याशाखेत त्या त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्तीला डीन करणे आवश्यक आहे. वातावरण पोषक झाले तर भौतिक सुविधांसाठी पैसा मिळणे अवघड बाब नाही. - राज ठाकरे