राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद, सात फूट २ इंच उंचीच्या तरूणाने लक्ष वेधले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 09:19 AM2021-07-03T09:19:35+5:302021-07-03T09:20:18+5:30
रत्नागिरी रक्तदान शिबिराचे उद्घाटनजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते झाले. यावेळी जाणीव फाउंडेशनचे महेश गर्दे उपस्थित होते
मुंबई/कोकण
मुंबई आजीवासन स्टुडिओ आणि मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने सांताक्रूझ पश्चिम येथे रक्तदान शिबिर पार पडले. भाजपचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. एकूण ४ दात्यांनी रक्तदान केले. तर, मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीतील कुस्तीगीर खाशाबा जाधव गार्डन येथे लोकमत आणि 'म्हाडा कॉलनी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ', 'रोटरी क्लब ऑफ मुंबई, मुलुंड पूर्व' यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते याचा उदघाटन करण्यात आले. येथे १४ जणांनी रक्तदान केले.
रत्नागिरी रक्तदान शिबिराचे उद्घाटनजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते झाले. यावेळी जाणीव फाउंडेशनचे महेश गर्दे उपस्थित होते. दिवसभरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या शिबिराला भेट दिली. लोकमत, जाणीव फाउंडेशन तसेच रहेबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले.
सिंधुदुर्ग ब्लड बँक आणि सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै
समिती सभागृह येथे महारक्तदान शिबिर पार पडले. या दोन्ही ठिकाणी मिळून २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
अलिबाग पोलीस मुख्यालयात लोकमत आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष माने यांनी एकाचवेळी रक्तदान केले. दिवसभरात रायगडात 215 जणांनी रक्तदान केले.
सात फूट २ इंच उंचीच्या तरूणाने लक्ष वेधले
औरंगाबाद लोकमत रक्तदान महायज्ञात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ७ फूट २ इंच उंच असलेल्या अभिषेक अंभोरे या २१ वर्षांच्या तरुणाने. त्याची उंची पाहून अनेकांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. मूळ बुुुलडाणा जिल्ह्यातील असलेल्या या तरुणाला आर्मीमध्ये भरती व्हायचे आहे. देशाची सेवा करण्याच्या प्रबळ इच्छेने त्याला औरंगाबादेत खेचून आणले. येथील हडको परिसरातील डिफेन्स करिअर ज्यु. कॉलेजमध्ये तो सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्याने आयुष्यात दुसऱ्यांदा रक्तदान केले. ७ फूट २ इंच उंची असल्याने मी प्रसिद्ध होत आहे. पण, मला देशसेवेत पराक्रमाची उंची गाठायची आहे, हेच जीवनाचे ध्येय असल्याचे त्याने सांगितले. रक्तदानासाठी नवयुवकांनी पुढे यावे, असे आवाहनही त्याने केले.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. आमदार माधुरी मिसाळ, भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, उद्योजक अमित गायकवाड, नगरसेवक प्रसन्न जगताप या वेळी उपस्थित होते.
कोल्हापूर नागाळा पार्क येथील शाहू ब्लड सेंटरमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महारक्तदान मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक व ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग, सचिव केदार राठोड, विक्रम चहाचे एरिया सेल्स मॅनेजर अभिजित देशमुख उपस्थित होते. एकूण ५३ जणांनी रक्तदान केले.
सातारा शाहुपूरी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत महारक्तदान मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गोसावी, मुख्याध्यापक संतोष सापते, शाहुपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे आदी उपस्थित होते. सातारा आणि कराड येथे झालेल्या रक्तदान शिबिरात १२० जणांनी रक्तदान केले.
सांगली येथे लोकमत कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सोलापूर चार ठिकाणी शिबिर झाले. लोकमत भवनमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माणिक चौक परिसरात आमदार विजयकुमार देशमुख, तर इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा यांच्या हस्ते शुभारंभ झाला. दिवसभरात १२९ जणांनी रक्तदान केले.
मराठवाडा
नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळ, महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने, सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा आदींच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी महिलांचा सहभाग मोठा होता. १०६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
हिंगोली येथे आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्षा गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. येथे ५२ जणांनी रक्तदान केले.
लातूर रक्तदान मोहिमेचा प्रारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला. ७८ जणांनी रक्तदान केले आहे.
बीड जालना रोडवरील बीड ब्लड बँकेत सकाळी
१० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिक्षिका संगीता दामोदर सपकाळ यांनी केले. दिवसभरात
३० दात्यांनी रक्तदान केले.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन आणि सेवा क्रिटीकल सेंटर यांच्या
वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन माजी आमदार शिवाजीराव चोथे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात १५ जणांनी रक्तदान केले.
उत्तर महाराष्ट्र/खान्देश
नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वतः रक्तदान करून मोहिमेचा शुभारंभ केला. तर नाशिकरोडला दुर्गा गार्डनजवळील स्टार प्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या शिबिरात एकूण १६८ दात्यांनी रक्तदान केले.
जळगाव रेडक्रॉस सोसायटी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रक्तदान मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात कासोदा, ता.एरंडोल व जळगाव येथे झालेल्या शिबिरात ८७ दात्यांनी रक्तदान केले.
धुळे महारक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. शिंदखेडा, दोंडाईचा आणि नरडाणा येथेही रक्तदान शिबिरे झाली. दिवसभरात चारही शिबिरात एकूण २५० जणांनी रक्तदान केले.