Join us

गोराईकरांचा किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: November 11, 2016 3:48 AM

बोरीवली - गोराई येथील आम्ही मावळे व स्वयम् युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या ‘फेरी गडकिल्ल्यांची’ स्पर्धेला गोराईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मुंबई : बोरीवली - गोराई येथील आम्ही मावळे व स्वयम् युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या ‘फेरी गडकिल्ल्यांची’ स्पर्धेला गोराईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण २१ सोसायट्यांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत दीप सोसायटीने साकारलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याने प्रथम पारितोषिक पटकावले.सलग दुसऱ्या वर्षी आयोजन झालेल्या या स्पर्धेत शालेय मुला-मुलींचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. दिवाळीमधील किल्ले साकारण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून लुप्त होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळेच इंटरनेट व मोबाइलमध्ये रमणाऱ्या सध्याच्या पिढीला किल्ले साकारण्याची परंपरा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी गोराईतील उत्साही तरुणांनी पुढाकार घेतला. या तरुणांच्या संकल्पनेतून आयोजन झालेल्या या स्पर्धेत मांडणी व माहिती या आधारे परीक्षण झाले.गोराईतील २१ रहिवासी सोसायट्यांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत दीप सोसायटीने अप्रतिम ‘विजयदुर्ग’ साकारून प्रथम क्रमांकावर कब्जा केला. तसेच रेणुका सोसायटीने ‘राजगड’ साकारताना द्वितीय क्रमांक पटकावला. तर साईश सोसायटीने साकारलेल्या ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील सुमारे ४०० गडकिल्ले सर करण्याचा दांडगा अनुभव असलेले इतिहास अभ्यासक हमिदा खान यांनी या स्पर्धेचे प्रमुख परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच त्यांच्यासोबत योगेश पाटील आणि गौरव भंदिर्गे यांनी साहाय्यक परीक्षक म्हणून परीक्षण केले. (प्रतिनिधी)