‘मी मुंबई’ अभियान प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:10+5:302021-07-23T04:06:10+5:30
मुंबई : मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान, अंत्योदय प्रतिष्ठान व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी ...
मुंबई : मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान, अंत्योदय प्रतिष्ठान व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी सायन सर्कल येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या शिबिराचे आयोजन केले होते.
या रक्तदान शिबिराला लोकमान्य टिळक म्युनिसिपल हॉस्पिटलच्या (सायन रुग्णालय) ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी राज्याकडे पुरेसा रक्तसाठा असणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत ‘लोकमत’ने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.
गुरुवारी सायन येथे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून अशा संकटात ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान महायज्ञाची चळवळ सुरू केली. ही रक्तदान चळवळ सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमात माझी संस्था व भाजपचे सर्व पदाधिकारी देखील सहभागी झाले याचा मला अभिमान आहे.
फोटो कॅप्शन - गुरुवारी सायन येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रसाद लाड यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, नगरसेविका नेहल शाह, राजेश्री शिरवडकर आणि सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.