मुंबई : मुंबईत १५ वर्षांपूर्वी ११ जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात २०९ निष्पाप जिवांचे बळी गेले होते. मागील दीड वर्षे मुंबईकरही कोरोना रुपी दहशतीचा सामना करीत आहेत. मात्र, कोरोना काळात रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 'लोकमत' आणि गंधकुटी संकल्प समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. घाटकोपर, माता रमाबाई आंबेडकर नगर येथील गंधकुटी विहार सभागृहात आयोजित या शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पराग शाह, भाजपचे प्रवक्ते (महाराष्ट्र) व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष तुषार कांबळे उपस्थित होते. गंधकुटी संकल्प समितीचे विश्वस्त संघदीप केदारे आणि अमित चंद्रमोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. ११ जुलै १९९७ रोजी माता रमाबाई नगरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तरुण वर्गच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी रक्तदान केले. कोविड काळात ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन या समितीमार्फत गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येते. 'लोकमत'मार्फत राज्यस्तरावर आयोजित रक्तदानाच्या या भव्य महायज्ञाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
आईच्या दहाव्या विधीला रक्तदान करून श्रद्धांजली
आईच्या मृत्यूनंतरच्या दहाव्याचा विधी उरकून आलेला स्थानिक तरुण आकाश शाह आणि त्याचे भावोजी देवेश गुप्ता यांनी रक्तदान करीत आपल्या आईला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. तिचे प्राण वाचविता आले नाही, पण रक्तदान करून एखादा जीव नक्कीच जगवू शकतो. हा विचार मनात आल्यानेच रक्तदान केल्याचे त्याने सांगितले.