मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. १८ सप्टेंबरपर्यंत ८ हजार ९८४ घरांसाठी ९२ हजार ७४४ जणांनी नोंदणी केली आहे. तर १ लाख २ हजार ९५३ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ६९ हजार २९ जणांनी घरासाठीची अनामत रक्कम भरली आहे. २२ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर २३ सप्टेंबरच्या रात्री १२ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ गो लाइव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची बातमी मिळावी यासाठी सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे.