मुंबई : रोटरॅक्ट क्लब ऑफ देवनार, रोटरी क्लब देवनार व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूरच्या जनरल एज्युकेशन अकॅडमीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ३६ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला. या रक्तदान शिबिरात तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिकदेखील सहभागी झाले होते.
या शिबिराला के. जे. सोमय्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
येत्या काळात संकटसमयी गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात रोटरी क्लब देवनारचे अध्यक्ष सुधीर मेहता आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ देवनारचे अध्यक्ष वसंतराज गोविंधन यांनी ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराचे कौतुक केले. त्याचप्रमाणे इतर संस्थांनीदेखील पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर राबवायला हवेत असे ते म्हणाले.
फोटो कॅप्शन - चेंबूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ देवनार आणि रोटरी क्लब देवनारचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.