‘सखीज गॉट टॅलेंटला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: May 9, 2016 02:42 AM2016-05-09T02:42:27+5:302016-05-09T02:42:27+5:30
आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरूप दागिन्यांचा साज, सहावारी, नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रूपापासून मारवाडी, बॉलीवूड अशा विविध अस्मितेचे प्रतिनिधित्व करीत सज्ज असलेल्या सख्या
मुंबई : आकर्षक वेशभूषा, केशभूषा, अनुरूप दागिन्यांचा साज, सहावारी, नऊवारी साडीतल्या मराठमोळ्या रूपापासून मारवाडी, बॉलीवूड अशा विविध अस्मितेचे प्रतिनिधित्व करीत सज्ज असलेल्या सख्या, जोशपूर्ण नृत्य, तालासुरात मंजूळ आवाजात सादर होणारी गाणी, सासू-सुनेचे संबंध, पाणीप्रश्न अशा विविध विषयांसह सादर झालेले अभिनय, सोबत बक्षिसे आणि मनोरंजनाची लयलूट अशा उत्साही वातावरणात महिलांनी मेजवानीचा आनंद घेतला.
निमित्त होते कलर्स वाहिनी आणि लोकमत सखी मंच आयोजित ‘सखीज गॉट टॅलेंट’चे. दादर येथील बी.एन. वैद्य सभागृहात शनिवारी मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली. कलर्स वाहिनीवर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ नावाची मालिका ३० एप्रिलपासून सुरू झाली आहे. या मालिकेचे प्रक्षेपण शनिवार, रविवार रात्री ९ वाजता होते. ‘सिर्फहुनर ही हैं पहचान’ या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर, दूरदृष्टी असलेले ख्यातनाम दिग्दर्शक करण जोहर, नृत्यनिपुण मलाईका अरोरा यांच्या अनुभवी परीक्षणातून सर्व कलाकार तावून-सलाखून बाहेर निघणार आहेत. त्या निमित्ताने सखींसाठी ‘सखीज गॉट टॅलेंट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नृत्य, गायन व इतर कलागुण या तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, सखींनी स्पर्धेची मजा लुटली आणि आपल्यातील उत्तमोत्तम कलागुण सादर करत सखींनी आकर्षक बक्षिसे मिळवली.
स्पर्धेतील गायन स्पर्धेचे परीक्षण संगीतशिक्षक दिलीप काशिकर, नृत्यदिग्दर्शनात उत्तम कामगिरी करणारे नृत्यदिग्दर्शक संतोष आंब्रे यांनी नृत्यस्पर्धेचे परीक्षण केले, तर सखींमधील इतर कलागुण पारखण्याचे काम कलाकार समीर मयेकर यांनी केले. स्पर्धेत सखींचा ताण हलका करण्याचे काम निवेदक नितीन घाणेकर याने केले.
आपल्या खुमासदार शैलीतील निवेदनाने त्याने साऱ्या सखींना खळखळून हसवले.
गेल्या वर्षभरात कलर्स चॅनेल आणि लोकमत सखी मंचतर्फे अनेक कार्यक्रमांची श्रृंखला संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यात यशस्वीरीत्या राबविली गेली. अनेक उल्लेखनीय कार्यक्रम या अंतर्गत घेतले गेले. याच श्रृंखलेत कलर्स चॅनेल लोकमत सखी मंच सदस्यांकरिता ‘सखीज गॉट टॅलेंट’ हा उपक्रम आयोजित केला होता.
स्त्रियांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जसे ‘लोकमत’ सखी मंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजले आहे, तसेच कलर्स चॅनेलनेदेखील आपल्या नावीन्यपूर्ण आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या कौटुंबिक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वतंत्र पकड निर्माण केली आहे आाणि म्हणून संयुक्तरीत्या राबवलेले प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. यात पुन्हा सखींच्या कलागुणांना वाव देणारा ‘सखीज गॉट टॅलेंट’ हा कार्यक्रम सखींना सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा ठरला. (प्रतिनिधी)