'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
By मनोहर कुंभेजकर | Published: March 14, 2023 04:02 PM2023-03-14T16:02:19+5:302023-03-14T16:02:55+5:30
'मनातली जाणीव' दिवाळी अंकाच्या संपादिका सोनल खानोलकर आणि 'निनाद प्रकाशन' आयोजित महिला दिन पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
मुंबई : गेल्या २३ वर्षांपासून मी सोनल खानोलकरला ओळखते. वडिलांच्या पश्चात तिनं 'खतरनाक' ची धुरा यशस्वीरीत्या पेलली. 'जाणीव उद्याची, स्त्री मनाची' द्वारे आयोजित महिला दिनाच्या या कार्यक्रमाला असाच उदंड प्रतिसाद मिळू दे." अशा शुभेच्छा ज्येष्ठ पत्रकार वैजयंती पंडीत-आपटे यांनी नुकत्याच शिवाजी नाट्यमंदिर येथे व्यक्त केल्या. 'मनातली जाणीव' दिवाळी अंकाच्या संपादिका सोनल खानोलकर आणि 'निनाद प्रकाशन' आयोजित महिला दिन पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या पत्रकारितेची मशाल अखंड तेवत ठेवत गेली २० वर्षे महिलांच्या जाणीवा जागृत करण्याचा हा सोहळा होत आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री माया जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री मोटिवेशनल, स्पिरिच्युअल स्पीकर, स्मिता जयकर,पत्रकार वैजयंती कुलकर्णी-आपटे, व्हाईस ओव्हर आर्टिस्ट, मेघना एरंडे-जोशी, रुचकर मेजवानी युट्यूब चॅनलच्या सर्वेसर्वा व शेफ अर्चना आर्ते, 'दार उघड बये' मालिकेतील प्रमुख अभिनेत्री सानिया चौधरी होत्या. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात 'लावण्य दरबार' प्रस्तुत लावणी नृत्य सादरीकरणाने झाली. मी गेली २३ वर्षे मनातली जाणीव हा दिवाळी अंक प्रकाशित करत आहे. ३० वर्षे वडिलांच्या पश्चात 'खतरनाक' अंकाचे संपादन केले. खूप आव्हानं पेलली, मात्र महिलांनी निराश न होता इतरांना प्रेरणा मिळेल असे काम करा. ज्येष्ठ साहित्यिका डॉ.विजया वाड यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
यावेळी 'विवाहित स्त्रियांना स्वातंत्र्य आहे का?' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानमूर्तींपैकी पत्रकारिता क्षेत्रात १८ वर्षे कार्यरत सीएनएन चॅनलच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे- पंडित, इनरव्हिल क्लब, मराठी विज्ञान परिषदेच्या उपाध्यक्षा व ९० पुस्तके ब्रेल लिपीत रुपांतरित करणा-या साधना वझे, 'अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था' संस्येथापिका व आदिवासी महिलांचे आरोग्य व मुलांच्या शिक्षणासाठी झटणा-या, आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे काम करणा-या ४.५ हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणा-या सुनिता नागरे यांचा सत्कार करण्यात आला.
जाणीव विशेष पुरस्काराने 'लावण्य दरबार'चे निर्माते हरी व स्मिता पाटणकर यांना त्यांच्या १०० वा प्रयोग सन्मानित करण्यात आले.