लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आवाज काढत बदलीसाठी मंत्रालयात फोन करणाऱ्या त्रिकुटाकडे गुन्हे शाखा चौकशी करत आहेत. यात ठगांनी स्पूफिंग कॉलद्वारे हा प्रताप केला होता. अशाच प्रकारे स्पूफिंग कॉल, एसएमएस आणि मेलद्वारेही फसवणुकीच्या घटना डोके वर काढत आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेने विकास गुरव (५१), किरण काकड़े (२६) आणि धीरज पठारे (३८) या त्रिकुटाला स्पूफिंग कॉलप्रकरणी अटक केली आहे. यात गुरवने पवारांच्या आवाजात फोन केला होता. स्पूफिंग ॲपद्वारे हा कॉल करण्यात आला होता. त्यामुळे कॉल पुण्यातून केला असतानाही तो सिल्वर ओक बंगल्यातून आल्याचे वाटत होते. मुंबई पोलिसांकडे अशा प्रकारे स्फूफिंग मेलद्वारे फसवणूकप्रकरणी जानेवारी ते जूनपर्यंत ४ गुन्हे नोंद आहेत, तर सायबर पोलिसांकडे अशा स्वरूपाच्या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे.
सावध राहण्याचे आवाहन
सायबर ठग शासकीय संस्था, खासगी कंपन्याच्या नावाचा वापर करत स्पूफिंग मेल, संदेश पाठवितात. त्या खाली लिंक पाठविण्यात येते. समोरच्या व्यक्तीला तो मेल अधिकृत कंपनीकडून आला असल्याचे वाटते. त्यामुळे असे मेल संदेश उघडण्यापूर्वी खातरजमा करा. अनोळखी लिंक उघडू नका. ही लिंक डाऊनलोड केल्यास, मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन, त्यातील संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्या आधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.