मुंबई: दरवर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळात सहभागी, तसेच विजेतेपद प्राप्त केल्यावर क्रीडा सवलतीचे वाढीव गुण मिळतात. या गुणांमुळे त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्यास मदत होते. मात्र यंदा क्रीडा व युवक संचालनालयातर्फे पात्र संघटनांची यादी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या या वाढीव गुण पद्धतीला चाप बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे हे गुण मिळणार नसल्याने टक्केवारी घसरण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे.राज्यात क्रीडा संस्कृती रूजण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत वाढीव क्रीडा गुण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र व भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न असलेल्या खेळ संघटनांची यादी क्रीडा व युवक संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे. यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या खेळाडूंनाच यापुढे वाढीव २५ गुण मिळणार आहेत.
क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणांना चाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:45 AM