Join us

खेळांचे पुरस्कार अन् पुरस्कारांचे खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:04 AM

पावसाळा हा सध्याचा भारतीय उपखंडातील ऋतू. हा ऋतू किंवा मौसम खेळाशी संबंधित नाही; परंतु जगभरात सर्वत्र खेळाचा मोठा उत्सव ...

पावसाळा हा सध्याचा भारतीय उपखंडातील ऋतू. हा ऋतू किंवा मौसम खेळाशी संबंधित नाही; परंतु जगभरात सर्वत्र खेळाचा मोठा उत्सव किंवा पर्वणी मानल्या गेलेल्या ऑलिम्पिकचे नगारे वाजत आहेत. अगदी काही दिवसांवर हा मैदानी खेळांचा सोहळा जपानमध्ये सुरू होणार आहे. जगभरातील कोरोनाच्या संकटामुळे अर्थातच हे ऑलिम्पिक पूर्वनियोजित वेळेपेक्षा पुढे ढकलून अंतिमतः होत आहे हे आशादायी आहे. त्याचबरोबर सध्या मानाचे विम्बल्डन, लोकप्रिय युरो कप फुटबॉल, महिला क्रिकेट अशा क्रीडा स्पर्धाही जगभर सुरू आहेत.

इकडे भारतात राष्ट्रीय पातळीवर जे क्रीडा पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जातात त्या सर्व क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या शिफारशी पाठवण्याची सूचना केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील युवा तिरंदाज प्रवीण जाधव याचा उल्लेख करून त्याचे कौतुक केले. या प्रवीण जाधवचा येत्या ६ जुलैला २५वा वाढदिवस आहे. या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर खेळांसाठी जे पुरस्कार व सन्मान दिले जातात त्याचा विचार करावासा वाटला, त्याचा हा परामर्श.

आपल्याकडे राष्ट्रीय पातळीवर खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य, ध्यानचंद इत्यादी तर राज्य पातळीवर शिवछत्रपती, जिजामाता, एकलव्य, जीवनगौरव, मार्गदर्शक इत्यादी पुरस्कार दिले जातात. या सर्वच पुरस्कारांचे खेळाडूंच्या दृष्टीने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि सार्वजनिक जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्यासाठी ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

सरकारी प्रक्रियेत किंवा पातळीवर कोणत्याही शिफारशी असोत त्यांना काही विशिष्ट निकष, अटी असतात. त्याचप्रमाणे खेळाच्या संबंधित पुरस्कारांनाही हे लागू आहे. या अटी वा निकष सर्वसाधारणपणे संघटना, अर्हता, पात्रता इत्यादी गोष्टींमध्ये अडकलेल्या दिसतात. यातून खेळांच्या स्पर्धांचे महत्त्व कमी होऊन पुरस्कारांच्या स्पर्धा सुरू होतात. हे सातत्याने दिसून येत आले आहे. पुरस्काराच्या सन्मानाने खेळाला आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याऐवजी गटबाजी, राजकारण, आरोप-दोषारोप, अनैतिक प्रकार यांनाच प्रोत्साहन मिळते. एखाद्या होतकरू, उमद्या व सर्वार्थाने पात्र खेळाडूला पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या आणि त्याला मिळणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेच्या बदल्यात काही मागणी करणे, तुझी शिफारस करतो; पण माझे ‘हे’ काम करून दे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने करणे असल्या व यासारख्या अत्यंत खालच्या पातळीपर्यंत या शिफारशींचा बाजार मांडला जातो हे दुर्दैवी वास्तव आहे.

वस्तूतः कला, क्रीडा हे प्रकार केवळ गुणवत्ता, सातत्य, परिश्रम व नवनवीन ध्येय गाठण्याची जिद्द यांचे सादरीकरण आहे. त्याचे मूल्यमापन केवळ ठरावीक कालावधीत सरकारी पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या पुढे आलेल्या केवळ काही अर्जांच्या छाननीतून न होता हे मूल्यमापन निरंतर प्रक्रिया असायला हवी. खेळाडूंनी अर्ज करावा हेच मुळात अयोग्य वाटते. तेही त्या खेळाच्या विशिष्ट संघटनेमार्फतच शिफारशी याव्यात म्हणजे खेळाडूवर अयोग्य बंधनच. त्याऐवजी केंद्र अथवा राज्य सरकार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर खेळाडूंनी स्वतःच पाठविलेल्या माहितीच्या आधारे त्या खेळाडूंच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यमापन व्हायला हवे. खेळाडूचे वय, त्याची कामगिरी, परिस्थिती, परिश्रम, जिद्द, त्याला मिळणारे शिक्षण-प्रशिक्षण, सुविधांची उपलब्धता, क्षमता इत्यादी गोष्टींचा विचार करून त्याचे कौशल्य व तंत्र कमीतकमी कालावधीमध्ये अधिक सक्षम होण्यासाठी पुरस्कारांचे प्रोत्साहन असावे असे मनापासून वाटते. सरकारी पुरस्कार मिळाला की मिळू शकणारी सरकारी नोकरी अथवा सूट हे आमिष न राहता खेळाडूंना अधिक मोठ्या ध्येयाला पोहोचण्याचे वेध लागावे हे पुरस्कारांचे प्रयोजन असावे.

प्रवीण जाधवसारखे अनेक खेळाडू वेगवेगळ्या खेळांमधे प्रावीण्य मिळवू शकतात; परंतु त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची, कौशल्य विकास प्रशिक्षण साधनांची, प्रशिक्षित मार्गदर्शकांची, उद्योग जगतातून मिळू शकणाऱ्या योग्य संधीची आणि पाठीवरच्या शाबासकीची.

खेळ व खेळाडूंची एक विशिष्ट वयोमर्यादा असते. त्यामुळे अत्यंत कमी वयात असतानाच या अशा खेळाडूंना हुडकून काढून त्यांना कठोर परिश्रमपूर्वक नियोजनाने घडवायला हवे. राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी पुरस्कारांचे खेळ न होता अथवा पुरस्कारांच्या स्पर्धा न होता, खेळांच्या अधिकाधिक स्पर्धा व्हाव्यात आणि खेळाडूंना ‘प्रोत्साहना’चे पुरस्कार मिळावे हेच यानिमित्ताने अधोरेखित करावेसे वाटते.

- फुलचंद राजाभाऊ बांगर

(लेखक शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहेत.)

(शब्दांकन : प्रसाद पाठक)