मुंबई : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य सरकारचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांच्यात समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
यासंदर्भात मंत्रालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत क्रीडामंत्र्यांसह विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सेवानिवृत ब्रिगेडिअर सुधीर सावंत, एनसीसी महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय.पी. खांडुरे उपस्थित होते. यावेळी मंत्री केदार म्हणाले की, महाराष्ट्रात क्रीडाविषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि त्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. लष्करातील तिन्ही दलांकडे उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एनसीसी विभागाकडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लष्कर आणि एनसीसीकडे असणाऱ्या या सुविधा राज्यातील विविध भागामध्ये उपलब्ध आहेत. या सुविधांचा राज्यातील तरुण खेळाडूंकरिता उपयोग करण्यासाठी क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. आज झालेल्या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे केदार यांनी सांगितले. सिंधुदुर्ग येथील क्रीडा संकुल प्रायोगिक तत्त्वावर एनसीसीकडे देण्याविषयी माहिती घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासनही केदार यांनी दिले.