मुंबई : दसऱ्याच्या फूल खरेदीसाठी मंगळवार सकाळपासूनच दादर मार्केट फुल्ल झाले होते. केशरी, पिवळ्या, गडद लाल रंगांच्या फुलांनी बाजार फुलून गेला होता. पण अवकाळी पावसामुळे यंदा बाजारात झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याचे दिसून आले. बजेट सांभाळण्यासाठी मुंबईकरांनी थोडी झेंडूची फुले घेतली. मात्र त्यांनी तर अन्य फुलांच्या खरेदीवर भर दिला. अवकाळी पावसाचा फटका झेंडूच्या शेतीला बसल्यामुळे यंदा आवक निम्म्यावर आली. दरवर्षी दसऱ्यासाठी ४०० ते ५०० टन झेंडू बाजारात येतो. यंदा मात्र फक्त १५० ते २०० टन इतकीच झेंडूची फुले बाजारात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच फुलविक्रेत्यांचेही नुकसान यंदा झाले आहे. आवक कमी झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलोमागे झेंडूच्या फुलांचे दर ३० ते ४० रुपयांनी वधारले आहेत. वधारलेल्या भावांमुळे मुंबईकर काही प्रमाणात नाखूश झाले. पण खरेदीसाठी दादर, भुलेश्वर फूल बाजारात गर्दी होती. यंदा भरगच्च पाकळ्यांच्या कोलकाता झेंडूने ग्राहकांना आकर्षित करून घेतले. कोलकाता झेंडूची किंमत ७० ते ८० च्या घरात होती. इतर झेंडूची फुले दरवर्षी ४० ते ५० रुपये किलो या भावाने विकली जातात. यंदा मात्र झेंडू ६० ते ८० रुपये किलो या भावाने विकला जात होता. झेंडूच्या बरोबरीनेच शेवंती, गुलछडी आणि गुलाबांच्या पाकळ्यांनाही ग्राहकांनी यंदा पसंती दिली. झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा तोरणांकडे वळवला होता. तोरणांमध्येही झेंडू कमी दिसून येत होता. तर आंब्याची पाने, भाताच्या लोंब्यांचे प्रमाण अधिक दिसून आले. झेंडूच्या वाढत्या किमतीमुळे तोरण घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. झेंडू आणि आंब्याच्या पानांपासून बनलेल्या तोरणांच्या किमती २० ते ५० रुपये इतक्या होत्या. या तोरणांत अजून काही फुले असल्यास त्याची किंमत ७० रुपयांपर्यंत होती. सातारा, सांगली आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले मुंबईत येतात. यंदा हे २५ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. माल कमी असल्यामुळे झेंडूचा भाव वधारला आहे. पण तरीही मागणी असल्याचे दादरच्या फूलविक्रेत्याने सांगितले. आवक घटलीसातारा, सांगली आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले मुंबईच्या बाजारात आणली जातात. यंदा हे २५ ते ३० टक्क्यांनी घटले आहे. ग्राहक जास्त आणि माल कमी असल्यामुळे झेंडूचा भाव वधारला आहे. पण तरीही मागणी आहे. ग्राहकांचा उत्साह दिसून येत असल्याचे दादरच्या एका फूल विक्रेत्याने सांगितले.झेंडू - ६० ते ८० रु.शेवंती - १३० ते १६० रु.मोगरा - ६०० ते ८०० रु.अष्टर - १० ते १५ रु. (जुडी)भाताच्या लोंब्या - १० ते १५ रु.आंब्याचे डहाळे - १० ते १५ रु.
दसऱ्याच्या खरेदीला उधाण
By admin | Published: October 22, 2015 2:48 AM