पसार कोव्हिड पॉझिटिव्ह चोराला अटक; रेल्वे पोलिसांची कारवाई
By गौरी टेंबकर | Published: September 17, 2022 10:41 PM2022-09-17T22:41:29+5:302022-09-17T22:42:36+5:30
रेल्वे पोलिसांनी अटक केली, असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मोबाईल चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या आणि कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आलेल्या चोराने शनिवारी पहाटे सरकारी रुग्णालयातून पळ काढला. पण नंतर त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली, असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आरोपीची ओळख साहिल लुफ्तार शेख (३५) अशी असुन त्याला १३ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील मस्जिद रेल्वे स्थानकावरून सीएसएमटी पोलिसांनी मोबाईल चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तक्रारदार राजकुमार पटेल (३१) हा डिलिव्हरी बॉय दुपारी सीएसएमटी स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढला होता. लोकल मस्जिद बंदरजवळ पोहोचली तेव्हा त्याच डब्यातील शेख याने पटेल याचा फोन हिसकावून पळ काढला. पटेल लोकल ट्रेनमधून खाली उतरला आणि सहप्रवाशांच्या मदतीने शेखला पकडले, नंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. रे रोड येथील रहिवासी असलेल्या शेखवर आयपीसी कलम ३९२ (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
परंतु, त्याच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान, शेख कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे त्याला १५ सप्टेंबर रोजी तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवि ण्यात आले. शनिवारी पहाटे ३ ते ३:१५ च्या दरम्यान तो बाहेर पडला. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या तीन लाकडी पट्ट्या काढून त्याने हातकड्या काढून टाकल्या असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तो पळाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच शहरातील पोलिस वर्तुळात संदेश देण्यात आला. शेख हाजी अली परिसरात दिसत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक मोरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.