बोरीवलीत २१ ते २३ मे दरम्यान 'फेसबुक लाईव्ह' द्वारे वसंत व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:06 AM2021-05-15T04:06:38+5:302021-05-15T04:06:38+5:30
मुंबई : बोरीवली पूर्व येथे गेल्या ३८ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य हे अखंड ...
मुंबई : बोरीवली पूर्व येथे गेल्या ३८ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य हे अखंड आणि अविरतपणे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करीत आले आहेत. 'कोविड १९' च्या जागतिक महामारीमुळे वसंत व्याख्यानमाला होईल की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. परंतु व्याख्यानमाला चालविणाऱ्या कार्यकर्त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत समाज माध्यमातून गेल्या वर्षी 'फेसबुक लाईव्ह'द्वारे ही वसंत व्याख्यानमाला थेट सातासमुद्रापार नेत मराठी साहित्य शारदेचा झेंडा रोवला.
गेल्या वर्षी दि,२५ ते २७ मे दरम्यान झालेल्या व्याख्यानमालेत सुमारे अठरा ते वीस हजार रसिक श्रोत्यांपर्यंत ही व्याख्यानमाला पोहोचली होती.
गेल्या वर्षीच्या यशामुळे आता कार्यकर्त्यांनी यंदाही ही वसंत व्याख्यानमाला फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित केली आहे. शुक्रवार दि,२१ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजतां अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे 'मानवी जीवनातील पाच विशेष योग' या विषयावरील व्याख्यानाने फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचा शुभारंभ करतील. शनिवार दि,२२ मे रोजी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. त्यात्याराव लहाने हे 'कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच' या विषयावर दुसरे पुष्प गुंफतील तर 'माझा चरित्रात्मक लेखन प्रवास' या विषयावरील व्याख्यानाने ज्येष्ठ सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर या ' 'फेसबुक लाईव्ह' वसंत व्याख्यानमालेचा समारोप करतील. (http://www.facebook.com//vasantvyakhyanmalajaimaharashtranagarBorivli103993061323124/?ti=as)या लिंक वर फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेचा लाभ घेता येईल.
रसिक श्रोत्यांना आपापल्या घरी बसून मोबाईल किंवा संगणकावर या कार्यक्रमाचा लाभ मिळू शकेल. ज्या रसिक श्रोत्यांना प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी विजय वैद्य यांच्या 9820826974 किंवा नयना रेगे यांच्या 9820451579 या क्रमांकावर नांवे नोंदवावीत. त्यांना झूम लिंक देण्यात येईल, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आयोजित करण्यात आलेल्या या 'फेसबुक लाईव्ह' व्याख्यानमालेचा सर्व रसिक श्रोत्यांनी लाभ घेऊन आयोजकांचा उत्साह द्विगुणित करावा. वसंत व्याख्यानमाला आयोजकांनी कोरोनाच्या काळात शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे, मास्क चा वापर आवर्जून करावा. सामाजिक अंतर राखावे आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असे नागरिकांना आवाहन केले आहे.
-----**************------------------------