इमारतीच्या आवारातच 'कम्पोस्ट टम्बलर' तयार करणारी स्प्रींग लिव्हज सोसायटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 02:08 PM2018-01-02T14:08:49+5:302018-01-02T14:29:54+5:30

मुंबईतील कांदिवलीच्या 'स्प्रींग लिव्हज 7' या सोसायटीने मात्र केवळ इमारतीच्या आवारातच कचऱ्यातून कम्पोस्ट निर्मिती केली नाही तर कमीत कमी जागेत, दुर्गंधीमुक्त कम्पोस्ट तयार करण्याचे यंत्रही स्वतःच तयार केले.

The Spring Lives Society, which composes the compost tumbler in the premises of the building | इमारतीच्या आवारातच 'कम्पोस्ट टम्बलर' तयार करणारी स्प्रींग लिव्हज सोसायटी

इमारतीच्या आवारातच 'कम्पोस्ट टम्बलर' तयार करणारी स्प्रींग लिव्हज सोसायटी

Next
ठळक मुद्दे सुयोग्य पद्धतीने कम्पोस्टिंग केल्यामुळे माशा, झुरळं किंवा कोणतेही किडे त्यांच्या टम्बलरजवळ येत नाहीत. त्याचप्रमाणे दुर्गंधीही येत नाही.हा प्रयोग पाहण्यासाठी इतर सोसायटीतील लोक स्प्रींग लिव्ह-7 ला भेट देतात.

मुंबई- ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करुन द्या, मोठ्या सोसायटींनी आपल्या आवारातच कम्पोस्ट तयार करावे अशा सूचना असल्या तरी बहुतांसवेळा व्यावहारिकदृष्ट्या तसे करणे सोसायटींना शक्य नसते. डम्पिंग ग्राऊंडला आग लागणे, कचऱ्यामुळे पाणी तुंबणे, पुरासारखी समस्या आणि प्रदूषण यावर सर्वत्र चर्चा होत असते पण त्यावर दृश्य स्वरुपात कोणाताही तोडगा काढला जात नाही. पण मुंबईतील कांदिवलीच्या 'स्प्रींग लिव्हज 7' या सोसायटीने मात्र केवळ इमारतीच्या आवारातच कचऱ्यातून कम्पोस्ट निर्मिती केली नाही तर कमीत कमी जागेत, दुर्गंधीमुक्त कम्पोस्ट तयार करण्याचे यंत्रही स्वतःच तयार केले.

देवनार डम्पिंग ग्राऊंला काही महिन्यांपुर्वी लागलेल्या आगीमुळे मुंबईमध्ये वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणात झाले होते. वारंवार या आगीमुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा चर्चेमध्ये आला होता. स्प्रींग लिव्हज -7 मध्येही याबाबत चर्चा सुरु झाली. लोकांनी केवळ कचरा फेकायचा आणि नंतरची सगळी जबाबदारी सरकारने उचलायची अशी मानसिकता साधारणतः सगळीकडे असते. पण आता सरकारवर जबाबदारी टाकण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवे असा विचार या सोसायटीत राहणाऱ्या आर.एस. श्रीनिवासन, सय्यद महंमद कुरेशी, शुभा श्रीनिवासन यांनी आपल्या आवारातच कचरा कम्पोस्ट करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला या तिघांनी सर्व सोसायटीमधील लोकांच्या घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची विनंती केली. ओला कचरा कोणता आणि सुका कोणता हे ओळखण्यासाठी पत्रके काढून ती लिफ्टमध्ये लावली. त्यांच्या या घरोघरी जाऊन सांगण्याचा परिणाम सर्व लोकांवर झालाच. दुसऱ्याच दिवसापासून सर्वांनी कचऱ्याचे वर्गीकरण करायला सुरुवात केली. पण सोसायटीचे सदस्य केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सरळ एक कचऱ्याच्या बादल्या विकत घेऊन सर्व घरांमध्ये वाटल्या. यामुळे या वर्गीकरणाची प्रक्रीया गांभीर्याने घेण्यास सुरुवात झाली.

कचरा गोळा केल्यावर त्याचे कम्पोस्टिंग करणे हे नवे आव्हान होतेच. स्प्रींग लिव्ह्ज-7 मध्ये कम्पोस्टिंगसाठी लागणारी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कम्पोस्ट टम्बलरचा उपयोग करण्याचा निर्णय झाला. टम्बलर हे एक लंबगोलाकृती साधे यंत्र असते. त्यामध्ये ओला कचरा टाकून ते फिरवले जाते. पण बाजारामध्ये हे टम्बलर अत्यंत महाग किंमतीला विकले जात होते. टम्बलर विकायला काही कंपन्याही सोसायटीमध्ये येऊन गेल्या मात्र त्यांच्या यंत्राची किंमत 80 ते 90 हजारांच्या घरामध्ये होती. त्यामुळे शेवटी इंटरनेटवरच्या माहितीवरुन या सदस्यांनी स्वतःच या यंत्राचे स्केच तयार केले आणि साधे पाण्याचे बॅरल त्यासाठी वापरायचे ठरवले. कांदिवलीच्याच एका वेल्डरला समजावून दिल्यावर त्याने या बॅरलपासून यंत्र बनवून दिले. त्याला बसवलेल्या हँडलमुळे ते बॅरल फिरवणेही शक्य झाले. हे सगळे करण्यासाठी सोसायटीला केवळ 7 हजार रुपयांचा खर्च आला. त्यानंतर ओल्या कचऱ्यामधून कम्पोस्ट करणे सुरु झाले.

ओला आणि सुका कचरा वेगळा केल्यामुळे सोसायटीमधून गोळा होणारा सुका कचरा म्हणजे प्लास्टिक पिशव्या, रद्दी सोसायटीतील सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ लागला. त्यातून थोडे पैसे मिळाल्यामुळे त्यांनाही कामासाठी हुरुप आला. कम्पोस्टचे टम्बलर दिवसातून चारवेळा फिरवावे लागते, ते फिरवण्यासाठी त्यांनी उत्साहाने मदत करायला सुरुवात केली.

आज स्प्रींग लिव्ह 7 चा टम्बलरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे सोसायटीतल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन एखादे चांगले काम कसे पूर्णत्वास जाऊ शकते याचं उदाहरण मुंबईकरांसमोर ठेवले आहे. सुयोग्य पद्धतीने कम्पोस्टिंग केल्यामुळे माशा, झुरळं किंवा कोणतेही किडे त्यांच्या टम्बलरजवळ येत नाहीत. त्याचप्रमाणे दुर्गंधीही येत नाही. त्यामुळे त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी इतर सोसायटीतील लोक स्प्रींग लिव्ह-7 ला भेट देतात.

कम्पोस्ट टम्बलर यंत्र कसे काम करते?
कम्पोस्ट टम्बलर हे दंगगोलाकृती पिंपासारखे यंत्र असते. त्यामध्ये ओला कचरा, वर्तमानपत्राची रद्दी आणि वाळलेली पाने व थोडे यीस्ट टाकून ते रोज फिरवले जाते. त्यातून बाहेर पडणारे पाणी यंत्राच्या खाली ठेवलेल्या ट्रेमध्ये गोळा केले जाते. हे पाणीही झाडांच्या वाढीसाठी वापरले जाऊ शकते. योग्य प्रक्रिया केली तर त्यातून दुर्गंधी येत नाही आणि माशाही येत नाहीत.

 

Web Title: The Spring Lives Society, which composes the compost tumbler in the premises of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.