स्प्रिंकल्स, स्मॉग गन आहे कुठे? बांधकामस्थळी सीसीटीव्हीचाही अभाव, आजपासून पालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 08:39 AM2023-11-28T08:39:32+5:302023-11-28T08:40:49+5:30
Mumbai News: हवेत धूलिकण वाढू नयेत, यासाठी बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभराची मुदतही दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, आता आज, मंगळवारपासून महापालिका कठोर तपासणी करणार आहे.
मुंबई : हवेत धूलिकण वाढू नयेत, यासाठी बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभराची मुदतही दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, आता आज, मंगळवारपासून महापालिका कठोर तपासणी करणार आहे. अनेक बांधकामस्थळांवर स्प्रिंकल्स, स्मॉग गन्स आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
२५ ऑक्टोबरला मुंबई महापालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या. बांधकाम प्रकल्पांना स्प्रिंकल्स, स्मॉग गन्स आणि सीसीटीव्हीची व्यवस्था इत्यादी उपाय सुचवले होते. त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. ती २५ नोव्हेंबरला समाप्त झाली. स्प्रिंकल्स, स्मॉग गन्स वसीसीटीव्ही अनेक ठिकाणी अजूनही बसविण्यात आलेले नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आल्या आहेत.
आढावा घेण्याचे काम सुरू होणार असून, ज्याठिकाणी अजूनही उपाययोजना केल्या गेल्या नसतील, त्याठिकाणी संयुक्तिक कारण आढळून न आल्यास कारवाई केली जाईल. नियमांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची मंगळवारपासून तपासणी होईल. त्यादृष्टीने सर्व विभाग कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुधाकर शिंदे, अपर आयुक्त, मुंबई महापालिका
पावसाचा हवापालट!
हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी सकाळी, संध्याकाळी व सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे हवेतील धूलिकण खाली बसल्याने हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला आहे. माझगाव, वरळी, बीकेसीसह बहुतांश ठिकाणांवरील हवा मध्यम ते समाधानकारक नोंदविण्यात आली असून, मुंबईमधील दृश्यमानता चांगल्यापैकी सुधारल्याचे चित्र आहे.
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक
परिसर प्रदूषण हवेचा दर्जा
पातळी
बीकेसी १०३ मध्यम
बोरीवली ८२ समाधानकारक
चकाला ५९ समाधानकारक
कुलाबा ४१ चांगला
कांदिवली ५२ समाधानकारक
भांडूप ६५ समाधानकारक
कुर्ला ७३ समाधानकारक
मालाड ४८ चांगला
माझगाव ३५ चांगला
मुलुंड ३७ चांगला
पवई ६५ समाधानकारक
सायन ६८ समाधानकारक
विलेपार्ले ३७ चांगला
वरळी २३ चांगला
काय होऊ शकते?
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर बंदी घालण्याचे कठोर पाऊलही पालिका उचलू शकते.
गेले महिनाभर प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. ही मोहीम पालिकेने निर्णायक टप्प्यावर आणून ठेवली आहे.
त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात प्रदूषण पूर्ण नियंत्रणात आणण्यावर पालिकेचा भर असेल. त्यामुळे कारवाईचे स्वरूप व्यापक असण्याची शक्यता आहे. फक्त बांधकाम क्षेत्रच नाही, तर अन्यप्रकारे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होणार आहेत.
प्रदूषणाची पातळी काहीशी कमी झाल्याने आणि पावसाने हजेरी लावल्याने इतक्यातच कृत्रिम पावसाचा पर्याय अवलंबला जाणार नाही.