Join us

१० जूनपासून मुंबईकरांना ‘स्पुतनिक’ लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:06 AM

दोन महिन्यांत एक कोटी लोकांचे लसीकरण करणारमहापालिका आयुक्त चहल यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

दोन महिन्यांत एक कोटी लोकांचे लसीकरण करणार

महापालिका आयुक्त चहल यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिकेने लसीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये आलेल्या तीनही निविदा ‘स्पुतनिक’ लसीसाठीच्या आहेत. त्यासंबंधीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, येत्या १० जूनपासून मुंबईकरांना ‘स्पुतनिक’ची लस उपलब्ध होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी दिली. महापालिकेने एक कोटी लसींचे डोस विकत घेण्यासाठी निविदा काढली आहे.

अशाप्रकारे निविदा काढणारी आणि एक कोटी लस विकत घेणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका ठरेल. लोकमत यूट्यूब आणि लोकमत फेसबुकसाठी वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी चहल यांच्याशी संवाद साधला. या निमित्ताने मुंबईकरांच्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरेही दिली. मुंबई महापालिका लस खरेदीवर सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे. १० जूननंतर ६० ते ७० दिवसांत संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. कारण दोन महिन्यांच्या आत एक कोटी स्पुतनिकचे डोस रशियन कंपनीने देण्याचे मान्य केले आहे, असेही चहल यांनी सांगितले. ही संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यू-ट्यूब’ आणि ‘लोकमत फेसबुक’वर उपलब्ध आहे.

(आतल्या पानात - लसीकरण वेगाने झाल्यास तिसरी लाट टाळणे शक्य!)

-------------------

(आतल्या पानासाठी बातमी)

लसीकरण वेगाने झाल्यास तिसरी लाट टाळणे शक्य!

महापालिका आयुक्त चहल यांना विश्वास

‘लोकमत’ला दिली विशेष मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लसीकरण वेगाने केल्यास तिसरी लाट टाळणे शक्य होईल. आतापर्यंत ३० लाख लोकांचे लसीकरण करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर आहे. १८ ते ४४ या वयोगटात एकूण ९० लाख लाभार्थी आहेत. केंद्रातून आठवड्याला दोन ते तीन लाख लस उपलब्ध होते. त्यामुळे लस उपलब्धतेसाठी जागतिक निविदा मागविण्यात आल्या. रशियातील ‘स्पुतनिक’ची लस मूळ उत्पादक कंपनीने उपलब्ध करून देण्याची तयारी तीन कंपन्यांमार्फत दाखविली आहे. कोविड काळात उपचारासाठी दरमहा दोनशे कोटी याप्रमाणे तीन महिन्यांत एकूण ७०० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. तीनशेची लस सहाशेला का घेतली? अशी टीका होऊ शकते; पण ही रक्कम लस खरेदीसाठी वापरल्यास शेकडो लोकांचे जीव वाचविणे शक्य होईल, असेही चहल यांनी स्पष्ट केले. ही मुलाखत ‘लोकमत यू-ट्यूब’ आणि ‘लोकमत फेसबुक’वर उपलब्ध आहे. त्यांच्याशी झालेली थेट बातचीत अशी -

‘स्पुतनिक’ लस प्रभावी ठरेल का?

- ‘स्पुतनिक’ची लस मुंबईतील कोरोनाच्या स्ट्रेनवर प्रभावी आहे का? याबाबत राज्याच्या टास्क फोर्सकडून शिफारस पत्र मागविण्यात आले आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडेही आम्ही विचारणा केली आहे. त्यांच्याकडून २५ तारखेच्या आत अभिप्राय येणे अपेक्षित आहे. त्याचवेळी या निविदेवर महापालिका निर्णय घेईल. ऑर्डर दिल्यानंतर एक ते दोन आठवड्यांच्या आत लस रशियाहून मुंबईत येऊ शकेल. त्यादृष्टीने पुरवठादार कंपनीशी आमचे बोलणे अंतिम टप्प्यात आहे.

घरोघरी लसीकरणाची महापालिकेची तयारी आहे का?

- उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिल्यास घरोघरी लसीकरण करू शकतो. विविध सर्वेक्षणानिमित्त आतापर्यंत मुंबईतील ३५ लाख १० हजार कुटुंबांपर्यंत पालिका पोहोचली आहे. त्यामुळे पुरेशी लस उपलब्ध झाल्यास घरोघरी पोहोचणे अशक्य नाही. २२७ वॉर्डांत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. स्थानिक सहायक आयुक्त आणि नगरसेवकांच्या माध्यमांतून लसीकरण केले जाऊ शकते, तसेच कॉर्पोरेट हाऊस, गृहनिर्माण सोसायट्यांना खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करून लसीकरण करून घेण्याची मुभा दिली आहे.

ऑक्सिजन तुटवड्याचा सामना कसा केला? सध्या काय परिस्थिती आहे?

- एप्रिल महिन्यात पालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे १७ एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत १६८ रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलविण्यात आले. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गुजरात राज्यातील जामनगर येथून अतिरिक्त १२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत सुदैवाने ऑक्सिजन तुटवड्याचा सामना करावा लागलेला नाही.

रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने आता लॉकडाऊन शिथिल करणार का?

- मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर चार टक्क्यांवर आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने काही व्यवहार सुरू होऊ शकतील. यामध्ये सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवणे याचा समावेश असेल. कार्यालयाच्या उपस्थितीवर फेरविचार होऊ शकतो. मात्र, लोकल ट्रेन पहिल्या टप्प्यात सुरू होईल की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.

...............................