‘सुलतान’ला आणण्यासाठी पथक, चार दिवसांत वाघोबा येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 02:42 AM2019-12-23T02:42:17+5:302019-12-23T02:42:23+5:30
चार दिवसांत वाघोबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार दाखल
सागर नेवरेकर
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही वर्षापासून नवीन पाहुणा येणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु काही कारणास्तव पाहुणा येण्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता. परंतु आता हा पाहुणा लवकरच उद्यानात दाखल होणार आहे. या पाहुण्याचे नाव ‘सुलतान’ (सी-१) असून तो नर वाघ आहे. हा वाघ दोन वर्षाचा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आठ जणांचे पथक सुलतानला आणण्यासाठी रविवारी पहाटे ५ वाजता रवाना झाले आहे. तीन ते चार दिवसात सुलतान उद्यानात दाखल होईल, असे उद्यान प्रशासनाने सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद म्हणाले की, सुलतान हा नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आहे. थंडी जाणवू लागल्यावर वन्यप्राण्यांना प्रवासादरम्यानच्या समस्या कमी प्रमाणात उद्भवतात. म्हणून २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उद्यानातील आठ जणांचे पथक नागपूरकडे रवाना झाले आहे. सुलतान वाघ हा प्रजोत्पादनासाठी आणला जाणार असून तो पर्यटकांना दाखविला जाणार नाही. सध्या उद्यानात चार वाघिणी व एक वाघ आहे.
व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पहाटेच्या सुमारास आठ जणांचे पथक नागपूर रवाना झालो आहोत. सोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे हेसुद्धा असून ते वाघाची प्रवासादरम्यान तपासणी करणार आहेत. नागपूरमध्ये सुलतान एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये आहे. या वाघाला छोट्या पिंजºयामध्ये घेताना छोटीशी जरी चूक झाली, तर ती चूक जीवावर बेतू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक त्याला एका पिंजºयातून दुसºया पिंजºयात घेतले जाईल. तसेच उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि नागपुरातील पशुवैद्यकीय अधिकारी दोघेही वाघाच्या आरोग्याची तपासणी करतील, असे नागपुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हाच त्याला दुसºया पिंजºयामध्ये सोडले जाईल. प्रवासावेळी दर एका तासामध्ये त्याच्या आरोग्याची तपासणी केली जाईल. यावेळी त्याला पाणी व मांस दिले जाईल. नागपूरवरून येताना वाहन सावकाश चालवावे लागेल. जेणेकरून वाघाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. प्रवासात लागणारी औषधे डॉक्टरांनी सोबत घेतली आहेत. याशिवाय जर काही समस्या निर्माण झाली, तर तेथील पशुवैद्यकांची मदत घेतली जाऊ शकते, असेही विजय बारब्दे यांनी सांगितले.
प्रजोत्पादनासाठी आणण्याचा निर्णय
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार वाघिणी असून त्यातील तीन वाघिणी तरूणी आहेत. तसेच एक वाघीण उतरत्या वयात आहे. उद्यानात प्रजोत्पनाची प्रक्रिया थांबली असून वाघांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वाढविण्यासाठी सुलतान वाघाला आणले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून या वाघाला पकडण्यात आले होते. सुलतानने दोन नागरिकांचा बळी घेतला, त्यामुळे त्याला वनविभागाने ताब्यात घेतले होते.