एसआरएला ३० चौ.मी. गाळे द्या
By admin | Published: April 16, 2016 02:07 AM2016-04-16T02:07:25+5:302016-04-16T02:07:25+5:30
पंतप्रधान आवास योजना तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गाळ्यांच्या चटई क्षेत्रफळातील तफावत दूर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस ३० चौरस मीटर इतके चटई क्षेत्रफळांचे गाळे
मुंबई : पंतप्रधान आवास योजना तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गाळ्यांच्या चटई क्षेत्रफळातील तफावत दूर करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस ३० चौरस मीटर इतके चटई क्षेत्रफळांचे गाळे देण्यात यावेत, अशी शिफारस गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने विशेषरीत्या नागरी क्षेत्राकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या संकल्पनेवर आधारित केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ प्रधानमंत्री आवास योजनेतील खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. या घटकाअंतर्गत (आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीकरिता) शासकीय यंत्रणा व खासगी संस्थांशी भागीदारी करून घरकुलांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. या घटकाखाली ३० चौरस मीटर चटई क्षेत्रफळाचे घरकुल/गाळा देण्यात येणार आहे.
मुंबई परिसरातील झोपड्यांचे निर्मूलन करण्यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत २५ चौरस मीटर चटई क्षेत्रफळाचे गाळे देण्यात येतात. नागरी भागांतील व्यक्तींकरिता देय असलेल्या चटई क्षेत्रफळासंबंधी केंद्र व राज्य शासनाचे धोरण यात विसंगती दिसून येते. ही विसंगती दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धोरणामध्ये एकरूपता यावी याकरिता पंतप्रधान आवास योजनेतील तरतुदीप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठीही ३० चौरस मीटर इतके चटई क्षेत्रफळाचे गाळे देण्यात यावे, अशी शिफारस वायकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)