लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेंबूरच्या लालडोंगर येथील एसआरए इमारतीच्या परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर दिवसभर सांडपाणी वाहत असते. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या २३ मजली एसआरए इमारतीत सुमारे ८०० कुटुंबे राहत आहेत. या इमारतीतील रहिवाशांना घरांचा ताबा देऊन अवघे दीड वर्ष झाले आहे. मात्र, मागील एक वर्षापासून या इमारतीच्या परिसरात नाला ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहत असते.
या इमारतीच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, इमारतीभोवती असलेल्या सांडपाण्याच्या वाहिनीमधून व मॅनहोलमधून मलमिश्रित पाणी वाहत असल्याने येथे नेहमी घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे येथील नागरिकांना दररोज नाइलाजास्तव या मलमिश्रित पाण्यातून वाट काढावी लागत आहे. येथे नागरिकांना दररोज अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने, नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या इमारतीच्या समोरच असणाऱ्या मार्गावरही मागील अनेक महिन्यांपासून मॅनहोलमधून सतत सांडपाणी वाहत असते.
यामुळे लालडोंगर परिसरातील सर्व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावरील सांडपाण्यामुळे रोगराई पसरल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. येत्या पावसाळ्याच्या अगोदर ही समस्या दूर करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.